घरात पेस्ट कंट्रोल करणं भोवलं, चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

घरात झुरळ झाल्याने त्यांच्या घरात शनिवारी १३ मार्चला पेस्ट कंट्रोल करण्यात आलं. पेस्ट कंट्रोलचे काम दुपारी ३.३० ला संपलं. त्यानंतर पाच वाजता कुटुंब आपल्या घरात गेले होते. त्यावेळी पेस्ट कंट्रोलचा वास येत होता.

घरात पेस्ट कंट्रोल करणं भोवलं,  चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
SHARES

घरात पेस्ट कंट्रोल करणं एका कुटुंबाला चांगलंच भोवलं आहे. पेस्ट कंट्रोलच्या फवारणीनंतर एका चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यात घडली. ऋत्वी पालशेतकर असं या मुलीचे नाव आहे. मुलगी गमावल्याचा जबर धक्का या कुटुंबाला बसला आहे 

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात ही घटना घडली. फेब्रिकेशनचा व्यवसाय असलेले राजू पालशेतकर हे पत्नी आणि चार वर्षांची मुलगी ऋत्वीसह कासारवडवली येथील डेफोडिल सोसायटीत राहत होते. घरात झुरळ झाल्याने त्यांच्या घरात शनिवारी १३ मार्चला पेस्ट कंट्रोल करण्यात आलं. पेस्ट कंट्रोलचे काम दुपारी ३.३० ला संपलं. त्यानंतर पाच वाजता कुटुंब आपल्या घरात गेले होते. त्यावेळी पेस्ट कंट्रोलचा वास येत होता. मात्र, पालशेतकर कुटुंबांने त्याकडे दुर्लक्ष केले. 

ऋत्वीच्या आईने रविवारी पहाटे घरात डास येऊ लागल्याने घराच्या खिडक्या बंद केल्या. त्यानंतर उग्र वासामुळे ऋत्वीला उलटी झाली. राजू पालशेतकर यांच्या पत्नीलाही मळमळ जाणवू लागली. ऋत्वीला श्वास घेताना त्रास होऊ लागला. मात्र, पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे हा त्रास होत असल्याचे गृहित धरुन या दोघांना थोड्या वेळाने बरे वाटेल, असे पालशेतकरांना वाटले. पण सकाळनंतर पुन्हा या दोघींना त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दोघींनाही घोडबंदर येथील नोबल रुग्णालयात खासगी रुग्णालयात दाखल केले. 

उपचार सुरु झाल्यानंतर पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा झाली. सायंकाळपर्यंत मुलीच्या प्रकृतीत फारसा फरक पडला नाही. अखेर सायंकाळी या चिमुरडीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यामुळे पालशेतकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.



हेही वाचा -

चिंता वाढली, राज्यात १७ हजार ८६४ कोरोनाचे नवे रुग्ण

दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोस द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा