वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, गोवंडीतील घटना

  Govandi
  वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, गोवंडीतील घटना
  मुंबई  -  

  चोरीच्या उद्देशाने घरात शिरून दोन चोरट्यांनी एका 82 वर्षाच्या वृद्ध महिलेची हत्या केल्याची घटना महिन्याभरापूर्वी गोवंडीत घडली होती. या प्रकरणात गोवंडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पार्वती तांंडेल असे मृत महिलेचे नाव असून त्या गोवंडीतील रेल्वे स्थानक परिसरात एकट्याच राहत होत्या.

  25 मार्चला नेहमीप्रमाणे त्यांचा नातू त्यांना सकाळी उठवण्यासाठी गेला असता त्या जखमी अवस्थेत दिसून आल्या. त्यांनी तात्काळ कुटुंबियांना याची माहिती दिल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच 14 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गोवंडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. खोलीचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी अरविंद देशमुख (29) आणि संतोष चिंचोळे (26) या दोन चोरट्यांना ताब्यात घेतले. पहिल्यांदा या दोन्ही आरोपींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. वृद्ध महिलेच्या हत्येच्या दिवशीच याच परिसरातील एका बारमध्ये देखील या चोरट्यांनी चोरी केली होती. बारमधील सीसीटीव्हीत या दोन्ही आरोपींचे चेहरे कैद झाले होते. महिलेच्या घरात काहीही मौल्यवान वस्तू न मिळाल्याने घरातील हंडा आणि कळशी घेऊन जात असताना वृद्ध महिलेने विरोध केला असता एका आरोपीने तिच्या डोक्यात रॉड घातल्याने ती गंभीर झाली होती. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर या आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.