मॉडेल असल्याची बतावणी करून त्याने घातला लाखोंचा गंडा

 Mumbai
मॉडेल असल्याची बतावणी करून त्याने घातला लाखोंचा गंडा
Mumbai  -  

आपण मॉडेल प्रिती शर्मा असल्याची बतावणी करून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना गंडा घालणाऱ्या एका भामट्याला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. कौसर खान असे त्याचे नाव असून तो कुर्ला परिसरात राहणारा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौसर हा बेरोजगार आहे. हातात काही कामधंदा नसल्यामुळे त्याने सोशल मीडियाचा आधार घेत प्रिती शर्मा असल्याची बतावणी अनेकांना केली. याच दरम्यान फेसबुक, वॉटस्अप, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो टाकून त्याने अनेकांशी मैत्री देखील केली. अनेकांशी गोड बोलून डेटिंगच्या बहाण्याने ऑनलाईन पद्धतीने त्याने लाखो रुपये उकळले. जसे त्याच्या अकाऊंटमध्ये ग्राहकांचे पैसे जमा व्हायचे तसा तो आपला मोबाईल बंद करुन टाकायचा.

दरम्यान, कथित मॉडेलच्या मित्राने तिचा फोटो सोशल मीडियावर पाहिला आणि त्याने तिला याची माहिती दिली. याप्रकरणी संबंधित मॉडेलने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याची दखल घेत पोलिसांनी कसून चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, त्याला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading Comments