खारमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

 Khar
खारमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

खार परिसरात एका पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी खार पोलिसांनी अख्तर बिस्मिल्ला खान (50) नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

खारच्या राम मंदिर रोड येथे राहाणारा अख्तर खान आणि त्याची पत्नी फातिमा खान (46) यांच्यात नेहमी भांडण होत असे. दारूच्या नशेत आपल्या पत्नीवर संशय घेऊन अख्तर तिला मारहाण करायचा. मंगळवारी रात्री अख्तर आणि त्याच्या पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि एकाएकी फातिमाच्या किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. हा आवाज ऐकून शेजारी त्यांच्या घराच्या दिशेने धावले. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. फातिमाच्या छातीतून आणि पायातून रक्त येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ फातिमाला रिक्षात घालून भाभा रुग्णालयात नेले. मात्र फातिमाच्या जखमा एवढ्या गंभीर होत्या की रुग्णालयात दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झाला.

हत्या करून अख्तर फरार झाला होता. मात्र याप्रकरणी खार पोलिसांत तक्रार दाखल होताच पोलिसांनी अख्तरला काही तासांमध्येच पकडले. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading Comments