संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर सांबराच्या शिंगांची विक्री करत असलेल्या तिघांना वन विभागाने अटक केली आहे. आतिश कुंचिकोर्वे, अन्वर हुसेन शेख आणि हर्षल शेट्ये अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, ते धारावी परिसरातील रहिवासी आहेत.
वन विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. आरोपींकडून शिंगे जप्त करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने तिघांनाही वन विभागाच्या कोठडीत पाठवले आहे.
वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ नुसार अशा प्रकारे शिंगांची विक्री, खरेदी किंवा साठवणूक करणे गुन्हा आहे आणि त्यासाठी दंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते.
ही शिंगे पुण्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. काही दिवसांत अहवालातून यासंदर्भातील स्पष्ट माहिती मिळेल, अशी माहिती परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चौकशीतून समोर आलेली माहिती अशी की, आरोपी ही शिंगे जंगलातून गोळा करून त्यांची विक्री करत होते. मात्र, यामागील नेमका स्रोत आणि इतर संलग्न व्यक्तींबाबत वन विभाग अधिक तपास करत आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात अशा प्रकारच्या तस्करीच्या घटना वारंवार घडत असल्याने वन विभाग अधिक सतर्क झाला असून, यासंदर्भात विशेष पथकांकडून लक्ष ठेवले जात आहे.
हेही वाचा