भारतातील चोरीचे मोबाइल नेपाळ-बांग्लादेशमध्ये विक्रीला

मुंबईतल्या महत्वाच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे मोबाइल चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीचा यलोगेट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या मुलांना सध्या डोंगरीच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे.

भारतातील चोरीचे मोबाइल नेपाळ-बांग्लादेशमध्ये विक्रीला
SHARES

मुंबईतल्या महत्वाच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे मोबाइल चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीचा यलोगेट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या मुलांना सध्या डोंगरीच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मुलांना मोबाइल चोरी करण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात आलं असून, ते फक्त मुंबईतच चोऱ्या करत नसून देशातील विविध राज्यांमध्येही चोऱ्या करण्यासाठी जात असल्याचं उघडकीस आलं आहे.


देशातील चोरीच्या मोबाइलची विक्री बांग्लादेश आणि नेपाळमध्ये

मूळची झारखंडची राहणारी असलेली ही मुलं काही दिवसांपूर्वी यलोगेट परिसरातील भाऊचा धक्का परिसरात आली होती. गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे मोबाइल लुटू पाहणाऱ्या या चौघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. पुढे या चौघांच्या चौकशीत जी धक्कादायक माहिती पुढे आली, त्याने पोलिसच चक्रावून गेले. या चौघांकडून पोलिसांनी ३० मोबाइल हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे हे चोरीचे मोबाइल बांग्लादेश आणि नेपाळमध्ये विकले जात असल्याचं समोर आलं आहे. झारखंडच्या एका छोट्या खेड्यात राहणाऱ्या या मुलांच्या आई-वडिलांना पैसे देऊन टोळीचे म्होरके मुलाला कामासाठी मुंबईला नेतो असं सांगायचे. मुंबईत आल्यानंतर सराईत आरोपींच्या मदतीने या मुलांना गर्दीच्या ठिकाणी भीक मागण्याच्या नावाखाली चोऱ्या कशा करायच्या याचं प्रशिक्षण दिलं जायचं. यासाठी म्होरके फक्त १२ ते १७ या वयोगटातील मुलांचीच निवड करायचे. तसंच एकाही मुलाला कुणी पकडलं तर त्याला पुन्हा टोळीत समाविष्ट करून न घेता. त्याची रवानगी त्याच्या मूळ गावी करायचे.या मुलांची राहण्यापासून ते जेवणापर्यंत सर्व व्यवस्था हे म्होरके करायचे.


चोरीसाठी राज्यभरात दौरा

दिवसाला प्रत्येक टोळीची ड्युटी हे म्होरके लावायचे. ही टोळी फक्त मुंबईपुरतीच चोऱ्या करत नसून, महत्वाच्या राज्यात सणासुदीलाही चोऱ्या करायला जायची. उदा. नवरात्रोत्सवात ही टोळी गुजरात आणि पश्चिम बंगालला चोऱ्या करायला जायची. गणपतीच्या सणाला ही टोळी महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाठवली जायची. तर इतर वेळी सीएसटी स्थानक, चर्चगेट स्थानक, हाजीअली दर्गा, सिद्धीविनायक मंदीर, सेंट माऊंट मेरी जत्रा येथे प्रत्येकाची ड्युटी लावली जायची.


सॅमसग, ओपो आणि व्हिओच्या मोबाइलला मागणी

ज्या कंपनीचा मोबाइल ही मुलं चोरायची त्यानुसार त्यांना मानधन मिळायचं. सॅमसंग, ओपो आणि व्हिओ या मोबाइल मागे या मुलांना सर्वाधिक पैसे मिळायचे. अॅप्पल कंपनीच्या मोबाइलचा शोध घेणं पोलिसांना सोपं असल्यामुळं ते मोबाइल चोरण्यास या मुलांना सक्त मनाई करण्यात आली होती.


पकडल्यानंतर वकिलांची फौज तयार

विशेष म्हणजे यातील कुठल्याही मुलाला रंगेहाथ पकडलं की, त्यांना स्वतःची सुटका कशी करावी याचंही प्रशिक्षण दिलं जायचं. पोलिसांनी पकडलं की, त्यांना सोडवण्यासाठी वकिलांची फौजही तयारीत असायची. मूळात जाणूनबुजून या टोळीमध्ये म्होरके अल्पवयीन मुलं समाविष्ट करून घ्यायचे. कारण अल्पवयीन मुलांना पकडल्यास त्यांना लगेचच सोडलं जायचं. जरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला तरी ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांची लगेचच सुटका होत असल्याचं या चौघांच्या चौकशीतून पुढे आलं आहे. पकडलेल्या मुलांना सध्या डोंगरीच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आलं असून, यलोगेटचे पोलिस ही टोळी चालवणाऱ्या मुख्य आरोपीचा कसून शोध घेत आहेत.हेही वाचा -

नारायण राणेंची घरवापसी?

फ्लॅटचं आमीष दाखवून चूना लावणारे अटकेतसंबंधित विषय