फ्लॅटचं आमीष दाखवून चूना लावणारे अटकेत


फ्लॅटचं आमीष दाखवून चूना लावणारे अटकेत
SHARES

मुंबईत घराच्या नावे फसवणूक होण्याच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. मुंबईसारख्या महागड्या शहरात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करताना अनेकजण फसव्या गृहप्रकल्पांना, फसव्या बिल्डरांना आणि फसव्या एजंटला बळी पडतात. अशीच फसवणूकीची एक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. परळ इथल्या भव्य अपार्टमेन्ट या टोलेजंग इमारतीत घर देण्याच्या नावाखाली १ कोटी २० हजार रुपयांना आपली फसवणूक झाल्याची तक्रार एका तक्रारदाराने पोलिसांत नोंदवली होती. त्यानुसार नोव्हेंबर २०१८ मध्ये याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवत दोन महिन्यांच्या आत फसवणूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिद्धार्थ आणि रोनिटा नावाच्या आरोपींना शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे या दोघांनी तक्रारदारासह सात जणांची फसवणूक केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तर घराच्या नावे या दोघांनी ६ कोटीपर्यंतची रक्कम लाटल्याचंही आर्थिक गुन्हे शाखेचं म्हणणं आहे.


ग्राहकांची फसवणूक

परळ इथं भव्य अपार्टमेन्ट ही टोलेजंग इमारत असून ही इमारत अनेकांना आकर्षित करते. याच इमारतीत घर देण्याच्या नावाखाली अटक करण्यात आलेल्या दोघांनी आठ जणांची फसवणूक केली आहे. मार्च २०१६ मध्ये या इमारतीचं काम सुरू असताना काही ग्राहक फ्लॅट खरेदी करण्याच्या उद्देशानं इमारतीचं काम पाहण्यासाठी आले होते. त्यात फसवणूक झालेल्या तक्रारदराचाही समावेश होता. तक्रारदार इमारतीची पाहणी करायला गेले तेव्हा इमारतीचं ९ व्या मजल्यापर्यंतचं काम पूर्ण झालं होतं. त्यावेळी तक्रारदाराला सॅम्पल फ्लॅटही दाखवण्यात आला होता. इमारत दाखवण्याचं काम सिद्धार्थ आणि रोनिटा या दोघांनी केलं होतं.

इमारत, सॅम्पल फ्लॅट आवडल्यानंतर तक्रारदाराने पुढचा व्यवहार करत १ हजार ४२० चौ. फुटाच्या घरांसाठी २ कोटी २० हजार अशी किंमत ठरवली. त्यानुसार आगाऊ रक्कम म्हणून दोघांना १ कोटी २० हजार रूपये तक्रारदारांने दिले. मात्र इमारत उभी राहून महिनोंमहिने उलटले तरी फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने तक्रारदाराने चौकशी केली असता त्यांना धक्काच बसला. ज्या दोघांनी फ्लॅट दाखवला, ज्या दोघांशी आर्थिक व्यवहार झाला ते दोघेही या प्रकल्पाशी संबंधित नव्हते. त्या दोघांचाही गृहप्रकल्प राबवणाऱ्या समुहाशी-बिल्डरशी कोणताही संबंध नव्हता वा कुठलीही भागीदारी नव्हती. ते दोघेही बोगस असल्याचं लक्षात आल्याबरोबर पोलिसांत धाव घेत तक्रारदाराने पोलिस तक्रार दाखल केली. त्यानुसार हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे केले नि आर्थिक गुन्हे शाखेने तपास करत नोव्हेंबर २०१८ मध्ये गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास करत असताना फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधातील पुरावे आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागले. त्यांची माहिती हाती लागली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या एकाचं नाव सिद्धार्थ असं अाहे तर दुसर्याचं नाव रोनिटा असं आहे. सिद्धार्थला गावदेवी परिसरातील त्याच्या घरातून तर रोनिटा याला प्रभादेवीमधील त्याच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर आता याप्रकरणी अधिक तपास सुरू असून या दोघांना आणखी किती जणांना गंडवलं आहे या शोध आर्थिक गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे. दरम्यान तक्रारदारासह सात जणांना या दोघांनी घराच्या नावे फसवल्याची माहिती समोर येत असून ६ कोटी रुपये त्यांनी उकळल्याचंही समोर आलं आहे.


हेही वाचा

भारताला झटका, मेहुल चोक्सीनं सोडलं भारतीय नागरिकत्व

रिक्षातील महिलांचे दागिने-बॅग चोरणारे सराईत चोरटे अखेर पोलिसांच्या हाती
Read this story in हिंदी
संबंधित विषय