आमदार रमेश कदमचा पोलिसांवरच आरोप, न्यायालयाचे चौकशीचे आदेश

 Mumbai
आमदार रमेश कदमचा पोलिसांवरच आरोप, न्यायालयाचे चौकशीचे आदेश
Mumbai  -  

कर्तव्यावरील पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करणारा आमदार रमेश कदम याने आता पोलिसांवरच आरोप करण्यास सुरूवात केली आहे, सहाय्यक पोलीस निरीक्षकाने माझ्याकडून 25 हजार रुपये मागितले आणि ते न दिल्याने माझा छळ केल्याचा आरोप रमेश कदम याने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने रमेश कदमने थेट न्यायालयात धाव घेतली. विशेष म्हणजे न्यायालयाने देखील रमेश कदम याचा अर्ज ग्राह्य धरत पोलिसांना या आरोपांची चाैकाशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी मंगळवारी नागपाडा पोलीस ठाण्यात रमेश कदमचा जबाब नोंदवून घेण्यात आला.

या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही रमेश कदमचा जबाब नोंदवून घेत असल्याची माहिती झोन 3 चे डीसीपी अखिलेश सिंग यांनी 'मुंबई लाईव्ह'शी बोलताना दिली.

आणाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी गेले कित्येक महिने तुरूंगाची हवा खात असलेल्या आमदार रमेश कदमचा याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. भायखळा कारागृहातून जे. जे. रुग्णालयात नेत असताना कदमने एपीआई मनोज पवार यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. लाच घेतल्याचा आरोप करत हक्कभंग आणण्याची धमकी देताना देखील रमेश कदम या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओने राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ झाला होता.

त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या तक्रारीवरून रमेश कदमविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात भादंवि 186, 189, 504, 506(2) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी रमेश कदमला अटक देखील करण्यात आली होती.

Loading Comments