कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली. पण त्याच्या एका कृत्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. विशाल गवळी असं मुख्य आरोपिचे नाव आहे.
धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळीला अटक केल्यानंतर त्याने बोटाने व्हिक्ट्री साईन दाखवल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सदर मुलीला गवळीने जबरदस्तीने उचलून रिक्षात घालून पळवून नेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आलं. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. तसेच गवळीलाही अटक केली.
कल्याण अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी निषेध मोर्चा काढला. मुलीच्या घरापासून हा मोर्चा काढण्यात आला. देशात आणखी किती निर्भया होणार आहेत? कधी थांबणार महिलांची अवहेलना? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
सप्टेंबर महिन्यात न्यायालयाने आरोपी गवळीची जामीनावर सुटका केली होती. पुन्हा एकदा या आरोपीने या मुलीचे अपहरण करत तिच्याशी गैरकृत्य करून तिची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
मागील वर्षीही या आरोपीने या मुलीला भर रस्त्यात गाठून तिचा पाठलाग केला होता. या मुलीला पकडून पळवून नेण्याचा प्रयत्न गवळीने केला होता. यावेळी या मुलीने प्रतिकार केल्यानंतर त्याने तिला मारहाण देखील केलेली.
विशाल गवळी या नराधमाने 13 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुलीची हत्या करून भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात मृतदेह फेकून दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेतील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे आरोपीच्या तिसऱ्या पत्नीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत केली होती. पतीने तिला पहिल्या दोन पत्नींसारखे सोडून देऊ नये, यासाठी तिने हे पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तपासादरम्यान विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीने मिळून मृतदेह एका रिक्षाच्या सहाय्याने भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. विशाल गवळीला शोधण्यासाठी पोलीस पथक सक्रिय होते, आणि शेगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मोठ्या गुन्ह्याची उकल केली आहे.
हेही वाचा