कल्याण तिसगाव परिसरात एका तरुणानं एका बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. त्या तरुणानं अल्पवयीन मुलीवर चाकूनं सात ते आठ वार केले. त्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे.
आदित्य कांबळे असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण मुलीवर केलेल्या हल्ल्यानंतर फिनेल प्यायला होता. त्यामुळं त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानं अल्पवयीन हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
मात्र हा तरुण काही दिवसांपासून या मुलीचा पाठलाग करत असल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी दिली आहे.
आरोपी आदित्य दुर्गा दर्शन सोसायटीच्या आवारात येऊन रहिवाशांना संबंधित मुलगी घरी किती वाजता येते याची माहिती घेत होता. रहिवाशांना तो कशासाठी माहिती घेतो याची जाणीव झाली नाही.
मृत मुलगी बुधवारी रात्री आठ वाजता आपल्या आई सोबत खासगी शिकवणी वर्गावरुन घरी येत होती. सोसायटीतील जिन्यातून घरात जात असताना आदित्यने पाठीमागून येऊन मुलीच्या आईला ढकलून देऊन मुलीवर चाकूने आठ वार केले. तिच्या आईने मुलाला विरोध करण्याचा प्रयत्न केला.
बेभान झालेल्या आदित्यने आईला दाद दिली नाही. छातीवर घाव झाल्याने मुलगी जिन्यात कोसळली.आईने आरडाओरडा करताच सोसायटीतील रहिवासी, पादचारी घटनास्थळी धाऊन आले. आदित्य तेथून पळून जात होता. रहिवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
गंभीर जखमी मुलीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू करताच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
हल्लेखोर आदित्यने दोन वेळा प्रेमासाठी गळ घातली होती. मुलीने त्यास नकार दिला होता. तो राग त्याच्या मनात होता. त्या रागातून त्याने हे कृत्य केले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.