कोपर्डी प्रकरणी दोषींना फाशी, आता न्यायपालिकेवरील विश्वास वाढेल - मुख्यमंत्री


कोपर्डी प्रकरणी दोषींना फाशी, आता न्यायपालिकेवरील विश्वास वाढेल - मुख्यमंत्री
SHARES

कोपर्डी बलात्कार प्रकरणी बुधवारी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.


मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

समाजातील अपप्रवृत्तींना जरब बसण्याबरोबरच न्यायपालिकेवरील विश्वासही वाढला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोपर्डीची घटना अत्यंत निंदनीय होती. संपूर्ण महाराष्ट्रात त्याची प्रतिक्रिया उमटली होती. तपास यंत्रणेकडून या प्रकरणाचा तातडीने तपास करण्यात आला.

आरोपींना फाशी झाली पाहिजे, अशी राज्यातील माता-भगिनींची भावना होती. न्यायालयाने लवकर आणि चांगला निकाल दिल्यामुळे या महिलांना दिलासा मिळाला आहे. या जलद प्रक्रियेमुळे न्यायालयावरचा विश्वास वाढला आहे. या शिक्षेमुळे अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींना जरब बसून महिलांवरील अत्याचारास पायबंद बसेल, अशी आशा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणा आणि सरकारी वकिलांचे अभिनंदन केले.


अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह असून, यामुळे पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारा आहे. निर्भया प्रकरणानंतर काँग्रेस सरकारने कायद्यात सुधारणा केली. त्यामुळे कोपर्डी प्रकरणाची सुनावणीही जलद झाली आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब बसेल, अशी अपेक्षा आहे.

यासोबत महिलांवरील अत्याचाराबाबतच्या इतर खटल्यातही जलदगतीने न्याय मिळेल, यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.



या तीन दोषींना फाशी

बलात्कार आणि खूनाचा कट रचल्याप्रकरणी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


पीडितेच्या आईची प्रतिक्रिया

'माझ्या छकुलीला न्याय मिळाला आहे. कुणावरही अशा प्रकारे अत्याचार होऊ नयेत. कोणत्याही मुलीवर असा अत्याचार झाल्यास मी धावून जाईन, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या आईने दिली.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा