आरपीएफ पोलिसानं घडवली बाप-लेकाची भेट

त्तर प्रदेशच्या मेरठ इथं राहणाऱ्या मनीष चौधरीचे वडील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. मनिषला फोटोग्राफीची अावड असल्यामुळे वडिलांनी गेल्या वर्षी त्याला तीन लाख रुपयांचा डीएसएलअार कॅमेरा विकत घेऊन दिला होता. १५ मे रोजी मनिष अापल्या मित्रांसह पिकनिकला गेला होता. त्याठिकाणी मनिषचा कॅमेरा हरवल्यानं घरी अाल्यावर वडील त्याच्यावर रागावले. याच रागातून त्यानं १८ मे रोजी घर सोडलं.

आरपीएफ पोलिसानं घडवली बाप-लेकाची भेट
SHARES

राग अनावर झाल्यानं उत्तर प्रदेशहून मुंबईत पळून आलेल्या एका १५ वर्षाच्या मुलाला आरपीएफ जवानानं त्याच्या घरच्यांच्या स्वाधीन केलं अाहे. या प्रवासात त्याच्यासोबत घडलेल्या विविध घटनांमुळे आणि घरातल्यांच्या आठवणीमुळे हा घाबरलेला मुलगा कुर्ला स्थानकांवर रडत असताना, आरपीएफच्या जवानांचं लक्ष त्याच्यावर गेलं. त्यानंतर आरपीएफ पोलिसांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधून ही भेट घडवून आणली.


कॅमेरा हरवल्यानं वडील रागावले

उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं राहणाऱ्या मनीष चौधरीचे वडील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. मनिषला फोटोग्राफीची अावड असल्यामुळे वडिलांनी गेल्या वर्षी त्याला तीन लाख रुपयांचा डीएसएलअार कॅमेरा विकत घेऊन दिला होता. १५ मे रोजी मनिष अापल्या मित्रांसह पिकनिकला गेला होता. त्याठिकाणी मनिषचा कॅमेरा हरवल्यानं घरी अाल्यावर वडील त्याच्यावर रागावले.



रागातून घर सोडलं

याच रागातून त्यानं १८ मे रोजी घर सोडलं. मेरठहून रेल्वेत बसून तो निझामुद्दीनला आला. त्याच्या खिशात फक्त २० रुपये होते. तेथून मनिष भोपाळला आला. भुकेनं व्याकूळ झालेल्या मनिषनं जवळच्या साई भंडारात जेवण केलं. तेथून रेल्वेनं तो चाळीसगावला आला. त्यावेळी एकट्या मनिषला पाहून रात्रीच्या वेळी काही गर्दुल्यांनी त्याला घेरत पैशांची मागणी केली.


गर्दुल्ल्यांनी केली मारहाण

मनिषनं विरोध केल्यानं गर्दुल्ल्यांनी त्याला मारहाण केली अाणि त्याच्याकडील २० रुपयेही काढून घेतले. भीतीपोटी मनिषनं तेथून पळ काढत मिळेल ती रेल्वे पकडून सीएसटी गाठले. मात्र मनिषचे नशीब तेथेही खराब निघाले. रेल्वेतून बाहेर पडत नाही, तोच टीसीने मनिषला पकडलं. पैसे नसल्यानं आणि मुंबईला प्रथमच आल्यानं मनिषनं कशीबशी करून टीसीकडून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर मनिष लोकल पकडून कुर्ला इथं आला.


कुर्ला स्थानकावर होता रडत 

मुंबईत पहिल्यांदा आलेल्या मनिषला कुठं जायचं, तेच कळत नव्हतं. कालपासून उपाशी असलेला मनिष कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर घरातल्या माणसांची आठवण काढत रडत बसला होता. त्यावेळी गस्तीवर असलेला आरपीएफ काॅन्स्टेबल दीपक शिंदे मनिषला पाहून त्याच्याजवळ गेला.


अखेर साधला कुटुंबाशी संपर्क

मनिषकडे विचारपूस केली असता, त्याला काहीही सांगता येत नव्हते. मनिषकडे व्यवस्थित चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे आरपीएफ पोलिसांनी मनिषच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यावेळी सोमवारी मनिषचे वडील मुंबईला येऊन त्याला घरी घेऊन गेले, अशी माहिती आरपीएफचे कुर्ला स्थानकावरील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश अत्री यांनी दिली.



हेही वाचा-

'ओएलएक्स'वरून गाडी विकताना सावधान!

दिलीप कुमारांचं घर बळकावू पाहणाऱ्या बिल्डराचा जामीन अर्ज फेटाळला


 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा