मध्य-हार्बर लोकलमध्ये लुबाडणारी टोळी जेरबंद

 wadala
मध्य-हार्बर लोकलमध्ये लुबाडणारी टोळी जेरबंद

वडाळा - मध्य आणि हार्बर लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या पाच सराईत दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. हाफिज नियाज अहमद खान, सिमान आफताब शेख, वैभव उर्फ बाब्या कदम, मन्नू विश्वकर्मा, सचिन उर्फ सच्च्या मासाळ अशी या आरोपींची नावे आहेत.

मानखुर्द ते वडाळा लोकलने प्रवास करणाऱ्या महादेव झोरे यांना 31 डिसेंबरला दरोडेखोर टोळीने जबर मारहाण करून त्यांच्या अंगावर चाकूने वार केला होता. तसेच त्यांच्या जवळील 55 हजाराचा मुद्देमाल लुटून पोबारा केला. जखमी अवस्थेत झोरे यांनी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस या टोळीच्या मागावर होती. मात्र दरोडेखोर सराईत असल्याने त्यांना शोधण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून पोलिसांची कसरत सुरू होती. या दरोडेखोरांना शोधण्याचे काम गुन्हे शाखा वडाळा लोहमार्ग पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे यांनी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत रासम यांच्याकडे सोपवले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रासम यांनी सीसीटीव्ही, आरोपींचा फोटो आणि गुप्त बातमीदारांची मदत घेतली. 2 फेब्रुवारीला हाफिज, सिमान, वैभव या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांची कसून चौकशी केली असता चौथा आरोपी मन्नूला तळोजे कारागृहात बंद असल्याचे पोलिसांना समजले. मन्नूला 6 फेब्रुवारीला तळोजे कारागृहातून ताब्यात घेतले. पाचव्या आरोपी राजूला 9 फेब्रुवारीला चेंबूरमधून सापळा रचून अटक करण्यात आले. त्याच्याकडून चाकू आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

Loading Comments