लोकलमध्ये प्रवाशांना लुटणारे अटकेत


लोकलमध्ये प्रवाशांना लुटणारे अटकेत
SHARES

धावत्या लोकलमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना वडाळा रेल्वे पोलिसांनी हत्यारासहित अटक केल्याची घटना रविवारी हार्बर मार्गावरील गुरुतेग बहादूरनगर स्थानकात घडली आहे. बिल्ला यादव (24) आणि अभिषेक दुबे (23) अशी चोरट्यांची नावे असून, दोघेही सायन कोळीवाडा येथील रहिवासी असल्याचे सूत्रांकडून समजते. 

काही दिवसांपूर्वी हार्बरच्या गुरुतेग बहादूरनगर ते सीएसटी प्रवास करणाऱ्या इशा आलम शेख नावाच्या मुलीची हजारो रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती. त्यावेळी गोंधळलेल्या इशा शेखने तत्काळ वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. फिर्यादीकडून मिळालेल्या वर्णनावरून वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश लाहीगुडे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे तपासाचे काम सोपविले होते. 

गुन्ह्याचा तपास चालू असताना सदरील आरोपी गुरुतेग बहादूरनगर रेल्वे स्थानक परिसरात संशयितरीत्या फिरताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने पाहिले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 8.5 इंच लांबीचा 5 इंच फायबर मूठ असलेला एक धारधार चाकू सापडला. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी धावत्या लोकलमध्ये एका महिलेला लुटल्याची कबुली दिली. याबाबत दोन्ही सराईत चोरट्यांवर कलम 394, 506, 34 भा.द.वि अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा