नागपाडाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शालीनी शर्मा यांची अखेर बदली

आझमींच्या आंदोलनानंतर शर्मा यांची बदली आता चेंबूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

नागपाडाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शालीनी शर्मा यांची अखेर बदली
SHARES
राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असतानाच नेते मंडळींकडून विरोध प्रदर्शने करण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी कामगारांचे प्रश्न घेऊन नागपाडा पोलिस ठाण्यात गेलेले समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांची तक्रार नोंदवून न घेता, पोलिसांनी तिथून निघून जाण्यास सांगितले, याच कारणांवरून आझमींनी पोलिसांविरोधात आंदोलन केले, या आंदोलनात त्यांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.  आझमींच्या आंदोलनानंतर शर्मा यांची बदली आता चेंबूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.


स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी सोसाव्या लागल्या समस्यांघेऊन अबू आझमी हे दोन दिवसांपूर्वी नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी आझमींची बाजू ऐकूण न घेताच, तिथून निघून जाण्यास सांगितले. हाच मुद्दा उचलून धर अबू आझमी यांनी त्या महिला अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे. त्याचबरोबर मजुरांना पोलीस स्थानकात बोलावण्यात येते आणि ४-५ तास उन्हात उभे करून पुन्हा माघारी पाठवले जाते, असा आरोपही त्यांनी केला आहे.


अबू आझमी म्हणाले, 'मी लोकप्रतिनिधी आहे. मला लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न सरकारसमोर मांडणे माझे कर्तव्य आहे. मात्र मजुरांच्या समस्येबाबत पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी गैरवर्तणूक केली, लोकप्रतिनिधीचे म्हणणे ऐकून न घेताच पोलिस ठाण्यातून बाहेर काढलं' असे आरोप आझमी यांनी उपस्थित पञकारांसमोर केले. आझमीच्या या आरोपानंतर नागपाडाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्या जागी आता चेॆबूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयप्रकाश भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भोसलेंच्या जागी शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा