महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पश्चिम बंगालमधील मुलीचे वाचले प्राण


महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पश्चिम बंगालमधील मुलीचे वाचले प्राण
SHARES

महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या तत्पर प्रयत्नामुळे पश्चिम बंगालमधील एका आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचला असल्याची घटना उघडकीस आली आहे. इन्टाग्रामवर या मुलीने पोस्ट करताच सायबर पोलिसांचे त्यावर लक्ष गेले. वेळ न दवडता महाराष्ट्र विभागाने या घटनेची माहिती पश्चिम बंगाल पोलिसांना दिली.



महाराष्ट्र सायबर विभाग हा 24 तास covid-19 संदर्भात समाज माध्यमावर निगराणी ठेवून आहे. यादरम्यान त्यांना इंस्टाग्रामवर  एक मुलगी आत्महत्या करणार असल्याची पोस्ट आढळून आली. ही बाब विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांना कळताच, त्यांनी संभाव्य घटनेचे  गांभीर्य ओळखून तातडीने पुढील पाऊल उचलले. सायबर सेल मधील तज्ज्ञांकडून संबंधित मुलीच्या अकाऊंटचे डिटेल्स तात्काळ शोधून काढले. ते पश्चिम बंगाल मधील बराकपूर येथील आढळून आले. त्यांनी तातडीने बराकपूर सायबर सेलचे पोलीस अधिकारी सत्यजित मंडल यांच्याशी संपर्क साधून संबंधित मुलीचा मोबाईल क्रमांक व सविस्तर माहिती देऊन संभाव्य घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. बराकपूर पोलिसांनी  तत्परतेने त्या मुलीचा शोध घेऊन तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. 

  महाराष्ट्र पोलिस सध्या सोशल मिडियावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने लॉकडाऊनच्या काळात 413 गुन्हे दाखल केले असून 223 लोकांना आतापर्यंत अटक केली आहे. त्यात आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 173 गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 164 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी 20 गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 7 गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी 45 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत 223 आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी 102 आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा