आणखी दोन संशयित दहशतवादी एसटीएसच्या जाळ्यात


आणखी दोन संशयित दहशतवादी एसटीएसच्या जाळ्यात
SHARES

प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला राज्यातील विविध शहरांमध्ये अन्नातून आणि पाण्यातून केमिकल्स हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा मोठा कट मंगळवारी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथका (एटीएस)नं मोठ्या धाडसानं उधळून लावला आहे. हा कट आखणाऱ्या इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित ९ जणांना मुंब्रा आणि औरंगाबादमधून अटक करत एटीएसनं राज्याला एका मोठ्या संकटापासून वाचवलं आहे. आता त्यापुढं जात एटीएसला हा कट आखण्यामध्ये सहभागी असलेल्या आणखी दोघांना अटक करण्यात यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांची एटीएसनं १० तास कसून चौकशी केल्याचं म्हटलं जात आहे.


मोठ्या घातपाताचा कट उधळला

काही तरूणांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरूणांची माथी भडकवली जात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसची काही दिवसांपासून या तरूणांवर करडी नजर होती. मंगळवारी अखेर एटीएसनं मुंब्रा आणि औरंगाबाद इथं छापे टाकत नऊ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या या नऊ जणांच्या चौकशीतून आणि त्यांच्याकडे सापडलेल्या घातक साहित्यातून धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे या संशयित दहशतवाद्यांनी प्रजासत्ताकदिनी राज्यातील विविध ठिकाणी अन्न आणि पाण्यातून केमिकल-अॅसिड हल्ला करण्याचा कट आखला होता. पण एटीएसच्या सर्तकतेमुळे राज्य मोठ्या संकटातून बचावले आहे. दरम्यान हा कट आखणार्यांनी 'उम्मत-ए-मोहम्मदि' या नावानं व्हॉट्स अॅप ग्रुप बनवला होता. या ग्रुपमध्ये १२ जण असल्याचं समजतं आहे. पण प्रत्यक्षात मात एटीएसला यातील ९ जणांनाच ताब्यात घेण्यात यश आलं होतं. तर एटीएस अन्य तरूणांचा शोध घेतं होतं. अखेर यात एटीएसला गुरूवारी यश आलं आहे. एटीएसनं या ग्रुपमधील आणखी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची १० तास कसून चौकशी केल्याचं समजतं आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


१२ जणांचा ग्रुप

गुरूवारी अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक जण अल्पवयीन असून दुसरा २१ वर्षाचा आहे. दरम्यान या संशयित दहशतवाद्यांच्या टोळीचा म्होरक्या मोहस्सीन सिराजउद्दीन खान हा असून तो मुंब्रा इथं काही वर्षांपूर्वी चप्पल विक्रीचा व्यवसाय करत होता. मार्च २०१८ पासून त्यानं समविचारी तरूणांंना एकत्रित करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांचा एक ग्रुप तयार केला. सर्वात आधी त्यानं यात आपले सख्खे भाऊ सलमान खान आणि तकी खान यांना सामील केलं. त्यापाठोपाठ सख्खा मेव्हणा मोहम्मद सरफराजला सामील करत पुढे १२ जणांचा ग्रुप तयार केला. या ग्रुपमधील दोन जण अल्पवयीन होते. एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी 'उम्मत-ए-मोहम्मदि' व्हॉट्स अॅप ग्रुप बनवला होता. एटीएसनं ताब्यात घेतलेल्या दोन अल्पवयीन संशयित या व्हाटस अॅप ग्रुपवर तितकेसे सक्रिय नसल्याचं समजतं आहे.


इसिसच्या संपर्कात?

एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, या ग्रुपचा म्होरक्या मोहस्सीन इसिस च्या संपर्कात होता. इसिसमध्ये सामिल होत इसिसची पाळंमुळं भारतात रूजवण्यासाठी हा गट प्रयत्नशील होता. त्यासाठीच या ग्रुपकडून राज्यात मोठा घातपात करत स्वत:चं उपद्रवमूल्य इसिसच्या म्होरक्याच्या नजरेस आणून द्यायचं होतं अशीही माहिती समोर आल्याचंही एटीएस अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. दरम्यान या गटानं मोठ्या घातपाताचा कट आखला होता. पाण्याच्या टाक्या आणि नागरिकांची गर्दी असलेली ठिकाणं त्यांनी हेरली होती. औरंगाबादमधील सिडको काॅलनी परिसरातील पाणी पुरवठा करणार्या टाक्यांचीही त्यांनी रेखी केली होती. त्यानुसार पाण्यातून आणि अन्नातून केमिकल-अॅसिडच्या माध्यमातून विषबाधा करण्याचा या ग्रुपचा कट होता. या १२ जणांच्या व्हाॅटसअॅप ग्रुपमधील चॅटींगमधून ही माहिती समोर असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.


हेही वाचा -

लग्नासाठी तरूणीवर बळजबरी करणारा अटकेत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा