नवीन पोलिस ठाणी अडकली लालफितीत

वाढणाऱ्या लोखसंख्येचा आणि गुन्हेगारीच्या प्रमाणाचा पोलिस ठाण्यांवर बोजा पडत असल्याचे पहायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून माजी पोलिस आयुक्तांनी राज्यसरकारकडे नवीन पोलिस ठाणी बांधण्याचा अहवाल पाठवला आहे. मात्र सध्या मुंबईत ९३ पोलिस ठाणी असून अनेक पोलिस ठाण्यांचा कारभार हा म्हाडाच्या इमारतीत किंवा खासगी जागांवर उभारलेल्या पोलिस ठाण्यातून सुरू आहे.

नवीन पोलिस ठाणी अडकली लालफितीत
SHARES

व्हीअायपी बंदोबस्त, सण, मिरवणुका, मोर्चे, आंदोलने हे सर्व सांभाळून शहरातील गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. पण दिवसेंदिवस वाढत्या ताणामुळे पोलिसांचं खच्चीकरण होत असल्याचं दिसून येत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर वाढता ताण आणि लोकसंख्येपुढे तुटपुंजं पोलिस दल फार काळ तग धरून राहणार नाही.  

त्यामुळे शहरात पोलिस ठाण्यांची संख्या वाढवणं गरजेचं असल्याचा अहवाल मागील अनेक वर्षांपासून गृहखात्याच्या कार्यालयात धूळखात पडला आहे. मात्र नवीन पोलिस ठाण्यांसाठी जागा आणि उभारणीसाठी लागणारे पैसे नसल्याचे कारण देत राज्यसरकार पोलिसांचीच परीक्षा घेत आहे. 


पोलिसांच्या दुर्बलतेचं चित्र 

सर्वसामान्यांवर संकट ओढावलं की, त्यांच्या तोंडी पहिलं नाव येतं ते, महाराष्ट्र पोलिसांचं. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' असं ब्रीदवाक्य असलेले पोलिस उन, वारा, मुसळधार पाऊस अशा कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव तत्परतेने पुढं सरसावतात. पण वाढत्या भाऊगर्दीत पोलिसांना आपलं कर्तव्य बजावणं जिकरीचं ठरू लागलं आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार आणि मराठा आंदोलनाच्या हिंसक बंदमध्ये भिरकावलेल्या दगडांचा मार खाताना, स्वत:ची वाहनं जळताना हताशपणे पाहताना पोलिसांच्या दुर्बलतेचं चित्र प्रकर्षाने दिसून आलं.


९३ पोलिस ठाणी 

 वाढणाऱ्या लोखसंख्येचा आणि गुन्हेगारीच्या प्रमाणाचा पोलिस ठाण्यांवर बोजा पडत असल्याचे पहायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून माजी पोलिस आयुक्तांनी राज्यसरकारकडे नवीन पोलिस ठाणी बांधण्याचा अहवाल पाठवला आहे. मात्र सध्या मुंबईत ९३ पोलिस ठाणी असून अनेक पोलिस ठाण्यांचा कारभार हा म्हाडाच्या इमारतीत किंवा खासगी जागांवर उभारलेल्या पोलिस ठाण्यातून सुरू आहे. 


जागा, पैशांची कमतरता 

विलेपार्ले येथे नवीन अत्याधुनिक पोलिस ठाण्याच्या उभारणीनंतर पोलिस ठाण्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या कार्यक्रमात पोलिस ठाण्यांच्या वाढीसाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवीन पोलिस ठाण्यांच्या उभारणीसाठी राज्यशासनाकडून २५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी घोषणाही केली खरी. मात्र नवीन पोलिस ठाणी उभारण्यासाठी राज्यसरकारकडे जागा आणि पैशांची कमतरता असल्याचे कारण मागील अनेक वर्षांपासून दिलं जात आहे.


घोषणा हवेतच

 एकीकडे मुंबई ही नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्यामुळे राज्य आणि केंद्राकडून शहरातील पोलिसांना कोणत्याही यंत्रणा कमी पडू दिल्या जाणार नाही अशा घोषणा वेळोवेळी दिल्या जातात. मात्र सरकारच्या या घोषणा हवेतच विरळ होत असल्याने पोलिसांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे शहरात नवीन पोलिस ठाणे वाढवण्याबाबतचा लालफितीत अडकलेला अहवाल मुख्यमंत्री तरी वेळ काढून बाहेर काढतात का ? याकडे पोलिसांचे लक्ष लागून राहिले आहे. हेही वाचा - 

वरळीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या वृद्घाला अटक

प्रसिद्ध निर्माती एकता कपूरच्या घरात चोरी, नोकरांवर संशय
संबंधित विषय