पोलिसांची १४३० बुलेटप्रूफ जॅकेट्स निकृष्ट दर्जाची!

प्रयोगशाळेतील पडताळणीत ४६०० पैकी फक्त ३००० बुलेटप्रूफ जॅकेट्स चांगल्या दर्जाची ठरली. तर उर्वरित १४३० जॅकेट एके ४७ सेल्फ लोडेड रायफल्स सारख्या बंदुकांच्या गोळ्यांसमोर निकृष्ट दर्जाची ठरल्याचं अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितलं.

पोलिसांची १४३० बुलेटप्रूफ जॅकेट्स निकृष्ट दर्जाची!
SHARES

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पोलिसांनी बुलेटप्रुफ जॅकेट घातलेलं असताना त्यांना वीरमरण आलं. दहशतवाद्यांच्या एके ४७ पुढे त्या जॅकेटचा निभाव लागला नाही. त्यानंतर मागच्या वर्षी महाराष्ट्र पोलिसांसाठी ५ हजार नवीन एमकेयू बुलेटप्रूफ जॅकेट मागवण्यात आले होते. मात्र तपासणीत यातील १४३० जॅकेट पुन्हा निकृष्ट दर्जाचे निघाल्याने ती संबधित कंपनीला परत पाठवण्यात आली आहेत.


निकृष्ट जॅकेटचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यानंतर निकृष्ट दर्जाच्या बुलेटप्रूफ जॅकेटचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर गृहखात्याने पोलिसांच्या सुरक्षेसाठी ५००० नवीन बुलेटप्रुफ जॅकेटची मागणी केली होती. या ५ हजार जॅकेटची किंमत अंदाजे १७ कोटी रुपये होती. हे जॅकेट बनवण्याचं कंत्राट कानपूरमधल्या लष्करी उपकरणे उत्पादकांना दिलं होतं. 

त्यानंतर योग्य पडताळणीसाठी ही जॅकेट्स चंडीगडस्थित केंद्रीय न्याय वैद्यक प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आली. या पडताळणीत ४६०० पैकी फक्त ३००० बुलेटप्रूफ जॅकेट्स चांगल्या दर्जाची ठरली. तर उर्वरित १४३० जॅकेट एके ४७ सेल्फ लोडेड रायफल्स सारख्या बंदुकांच्या गोळ्यांसमोर निकृष्ट दर्जाची ठरल्याचं अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितलं. निकृष्ट दर्जाची बुलेटप्रूफ जॅकेट पुन्हा कानपूरच्या लष्करी उपकरणे बनवणाऱ्या कंपनीकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.



१७ कोटींची जॅकेट खरेदी

यापूर्वी २००१ साली महाराष्ट्र पोलिसांनी बुलेटप्रुफ जॅकेट्स विकत घेतल्या होत्या. मात्र विकत घेतलेल्या सर्व जॅकेट्स निकृष्ट दर्जाची असल्याचं २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातून सिद्ध झालं होतं. या जॅकेटला ९ एमएमच्या पिस्तुलमधून सुटलेली गोळीही भेदू शकते, हे एका चाचणीतून समोर आलं होतं. महाराष्ट्र पोलिसांची संख्या २ लाख असून त्यांच्यांसाठी फक्त २००० बुलेटप्रूफ जॅकेट्स विकत घेतल्या होत्या. या जॅकेटचा पुरवठा मार्च २०११मध्ये करण्यात आला होता. 

आता १७ कोटी रुपयांमध्ये महाराष्ट्र सरकार नवीन बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी करणार असून ती पोलिस विभागातल्या वेगवेगळ्या युनिटमध्ये वितरीत करण्यात येणार आहेत. या नवीन बुलेटप्रूफ जॅकेट्स मुंबई पोलिस शीघ्र कृती दल, फोर्स वन, राज्य राखीव पोलीस दल, विशेष कृती दल, गडचिरोली पोलीस आणि नक्षली भागांमधील पोलिसांना देण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा