सचिन सावंत यांच्या हत्येतील आरोपीला आठ वर्षानंतर अटक


सचिन सावंत यांच्या हत्येतील आरोपीला आठ वर्षानंतर अटक
SHARES

कांदिवली येथील शिवसेनेचे उपशाखा प्रमुख सचिन सावंत यांच्या हत्येतील मुख्य आरोपीला पकडण्यात तब्बल आठ वर्षानंतर कुरार पोलिसांना यश आलं आहे. समरबहादूर महाबल यादव उर्फ पिंटू असं या आरोपीचं नाव आहे. गोकुळ नगर परिसरातील एका एसआरए प्रकल्पात वर्चस्व प्रस्थापित ठेवण्याच्या वादातून सचिन यांची हत्या करण्यात आली होती. यासाठी आरोपींना १० लाख रुपयांची सुपारी दिल्याचंही पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे.


असा रचला हत्येचा कट

कांदिवली येथील शिवसेनेचे उपशाखा प्रमुख सचिन सावंत यांची मे २०१० मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासात अखेर कांदिवली पोलिसांना मोठं यश आलं आहे. आरोपींनी कांदिवली येथील अप्पापाडा परिसरातच सावंत यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली होती. 


सात आरोपींना यापूर्वीच अटक

याप्रकरणात पोलिसांनी या पूर्वीच लोकेश सिंह (२५), अभय उर्फ बारक्या पाटील (२६), सत्येंद्र उर्फ सोनू रामजी पाल (२४), नीलेश शर्मा (२७), ब्रिजेश उर्फ ब्रिजा नाथुराम पटेल (३६), अमित निरंजन सिंह (२५) आणि ब्रिजेश श्रीप्रकाश सिंह (२८) या सात आरोपींना उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि जौनपूर येथून अटक केली होती.

मात्र या हत्याकांडातील मुख्य आरोपी समरबहादूर महाबल यादव उर्फ पिंटू हा मागील अनेक महिन्यांपासून फरार होता. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते. 



सापळा रचून अटक

या हत्येचा संपूर्ण कट ब्रिजेश पटेल, ब्रिजेश सिंह आणि नीलेश शर्मा यांनी रचला होता, असं पोलिस तपासात समोर आलं आहे. समरबहादूर महाबल यादव उर्फ पिंटू हा दहिसर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा