SHARE

मेव्हणीच्या लग्नाला पैसे न दिल्याने पत्नीकडून वारंवार होणाऱ्या शब्दांच्या भडीमाराला कंटाळून पतीने पत्नीची हत्या करून चोरीचा बनाव केल्याची धक्कादायक बाब भांडुपमध्ये उघडकीस आली आहे. नेहा गुप्ता असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी बिरबल रामकुमार गुप्ता (32) याला अटक केली आहे.


काय आहे प्रकार?

एका खासगी कंपनीत चालक म्हणून कामाला असलेला बिरबल भांडुपमध्ये पत्नी नेहासोबत राहतो. या दोघांना तीन मुली आहे. दरम्यान नेहाच्या बहिणीचं काही दिवसांपूर्वी लग्न ठरलं होतं. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र मुंबईला लग्न म्हटंल की, पैसे हे तोकडे पडतातच, त्यामुळे नेहा आपल्या बहिणीच्या लग्नाला आर्थिक मदत करण्यावरून बिरबलकडे तगादा लावून बसली होती. यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. नेहाच्या या वागण्याला बिरबल पूर्ता कंटाळला होता. याच मानसिकतेतून त्याने नेहाची हत्या करण्याचा कट रचला.


अशी केली हत्या

शुक्रवारी पहाटे मुली गाढ झोपेत असताना बिरबलने धारदार चाकून नेहाची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर सर्व घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून टाकलं. त्यानंतर नेहाचे हात पाय बांधून त्याने आरडा ओरडा करत शेजाऱ्यांना जागं केलं. आपल्या घरी आपण नसताना चोरी झाली. त्यावेळी चोरांनी पत्नीवर हल्ला केल्याचा बनाव रचला. नेहाला मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत चौकशीस सुरूवात केली. त्यावेळी मुलींकडे केलेल्या चौकशीत वडील बिरबल यांनीच हत्या केल्याचं उघडकीस आलं. दरम्यान पोलिसांच्या चौकशीत बिरबलने गुन्ह्याची कबुली दिली.  

संबंधित विषय
ताज्या बातम्या