मॅट्रिमोनिअल साईटवर मनासारखा जोडीदार शोधताय? मग हे वाचा:


मॅट्रिमोनिअल साईटवर मनासारखा जोडीदार शोधताय? मग हे वाचा:
SHARES

आपल्याला मनासारखाच जोडीदार मिळावा, अशी प्रत्येक तरुण तरुणीची इच्छा असते. मग ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेकजण मेट्रोमोनियल साईटचा पर्याय निवडतात. पण हा पर्याय निवडताना जरा सावधानता बाळगा. कारण मेट्रोमोनियल साईटवरून संपर्क साधत एका तरुणीला कॉफी पिण्याच्या बहाण्याने भेटायला आलेल्या भामट्याने तरुणीची लाख रुपयांची हिरेजडीत अंगठी लंपास केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुनिल उर्फ निखिल कृष्णा पेंढारी याला अटक केली आहे. न्यायालयाने सुनिलला २७ डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.


घटना कधीची

जुनी प्रभादेवीच्या परिसरात कुटुंबियांसोबत राहणाऱ्या ३४ वर्षीय फॅशन डिझायनर तरुणीची ओळख १५ जून २०१७ रोजी मेट्रोमोनिअल साईटवर सुनिलशी झाली होती. त्यावेळी त्याने आपलं नाव आर्यन पटेल असल्याचं तरुणीला सांगितलं होतं. आपण एका खासगी कंपनीत मोठ्या हुद्यावर कामाला असल्याचे सांगत त्याने तरुणीला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर दोघेही काही दिवस फोन आणि व्हॅाट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. सुनिलने तरुणीला मोठमोठी स्वप्ने दाखवली होती. त्यावर विश्वास ठेवत या तरुणीने सुनिलला लग्नासाठी होकार कळवला. महिन्याभराच्या ओळखीनंतर दोघांनी ११ जुलै रोजी खार, कार्टर रोड येथील कॅफे कॉफी डे येथे भेटायचं ठरवलं.


कशी केली चोरी

आयुष्यभरासाठी निवडलेल्या जोडीदाराला पहिल्यांदाच भेटण्यासाठी आलेली तरुणी उत्साहात होती. दोघांची भेट झाली खरी. पण सुनिलची नजर मात्र तरुणीने घातलेल्या हिरेजडित अंगठीकडेच होती. तो तिने घातलेल्या अंगठीची स्तुती करू लागला. ऐवढ्यावरच न थांबता त्याने अंगठी पाहण्यासाठी मागितली. तिनेही विश्वासानं अंगठी त्याच्या हातात दिली. मात्र त्याचवेळी फोन आल्याचा बहाणा करत सुनिल अंगठी घेऊन कॅफे कॉफी डे च्या बाहेर आला. अर्धा तास उलटूनही सुनिल रेस्टॉरंटमध्ये न परतल्याने तरुणी त्याला पाहण्यासाठी बाहेर आली. त्यावेळी तो कुठेही आढळला नाही. त्याचा फोनही बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने थेट खार पोलीस ठाणे गाठत सुनिल विरोधात गुन्हा नोंदवला.


आरोपीला अटक

खार आणि सांताक्रूझ पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या चार गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याकडे लक्ष केंद्रीत केले. त्यानुसार सुनिल खार लिंक रोड येथे येणार असल्याची माहिती खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांना मिळाली. क्षणाचाही विचार न करता पोलिसांनी सापळा रचून सुनिलला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी सुनिलकडून चोरीचे ८ तोळे सोनं, २ मोबाइल, ५ हजार रोख रक्कम हस्तगत केली. न्यायालयाने सुनिलला २७ डिसेंबरपर्यंतची पोलीस कस्टडी सुनावली आहे.



हेही वाचा - 

सव्वा लाखांना पडला कॉफीचा 'एकच प्याला'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा