दुसरं घर घेतल्यामुळे अभिनेत्रीवर गुन्हा दाखल


दुसरं घर घेतल्यामुळे अभिनेत्रीवर गुन्हा दाखल
SHARES

मुंबईच्या खेरवाडी पोलीस ठाण्यात अभिनेत्री आकृती मिस्त्रीवर म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

२००४ साली म्हाडाच्या सोडतीत आकृती मिस्त्री हिला घर लागले होते. त्यानुसार तिला कागदपत्रांची पूर्तता केल्यावर महालक्ष्मीच्या वैशालीनगर येथे घर मिळाले. २०११ साली तिने हे घर सुरेश हेलिया नावाच्या व्यक्तीला विकले.

२००६ सालच्या म्हाडाच्या सोडतीत तिने पुन्हा घरासाठी कलाकारांच्या कोट्यात अर्ज केला आणि यावेळी दिंडोशी मालाड येथे घर मिळवले. २०१३ साली हे घर चंद्रेश मौर्या नावाच्या व्यक्तीला विकले. म्हाडाच्या नियमानुसार मुंबईत नावावर घर असलेली व्यक्ती म्हाडाच्या लॉटरीला अर्ज करू शकत नाही.

या सगळ्या व्यवहाराचा म्हाडाला तक्रारी आल्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. मात्र चौकशीला आकृती कधी हजरच झाली नाही. शेवटी म्हाडाने आकृती विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

खेरवाडी पोलीस ठाण्यात म्हाडाचे इस्टेट मॅनेजर योगेश महाजन यांच्या तक्रारींवर खेरवाडी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२० (फसवणूक) कलम १९९ आणि कलम २०० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी आम्ही म्हाडाच्या तक्रारींवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती, खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा