मुंबईत दिवसाला हरवतात ५ मुली, पोलिसांना नाही गुन्ह्याचं गांभीर्य

मुंबईसारख्या सुमारे सव्वा दोन कोटी लोकसंख्येच्या शहरात लहान मुलं-मुली बेपत्ता किंवा चोरीला जाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुलं म्हणजे देशाचं भवितव्य, असं मानणाऱ्या देशात हे भविष्यच जर हरवत असेल तर यावर नक्कीच गांभीर्याने विचार करायला हवा.

मुंबईत दिवसाला हरवतात ५ मुली, पोलिसांना नाही गुन्ह्याचं गांभीर्य
SHARES

मुंबईसारख्या सुमारे सव्वा दोन कोटी लोकसंख्येच्या शहरात लहान मुलं-मुली बेपत्ता किंवा चोरीला जाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुलं म्हणजे देशाचं भवितव्य, असं मानणाऱ्या देशात हे भविष्यच जर हरवत असेल तर यावर नक्कीच गांभीर्याने विचार करायला हवा.

मुंबईत टोळ्या सक्रीय

शहरात बेपत्ता मुलं-मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मुला-मुलीचं अपहरण करून त्यांना भीक मागायला तसंच अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकललं जातं. या मुलांचं अपहरण करणाऱ्या सक्रीय टोळ्यांचा मनसुबा पोलिसांनी अनेकदा उधळून लावला आहे. मात्र पकड ढिली होताच हे अपहरणकर्ते पुन्हा डोकं वर काढत असल्याचं स्पष्ट होत आहे. बेपत्ता लहानग्यांची वाढती संख्या पाहून न्यायालयानंही पोलिसांना अनेकदा फटकारलं आहे. 


बेपत्ता मुलांची संख्या

चालू वर्षात जानेवारी २०१९ ते मे २०१९ मध्ये ५५३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी ४१३ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं. मात्र गेल्या वर्षातील बेपत्ता मुलींची संख्या धरल्यास ३९७ हून अधिक मुली अद्याप बेपत्ता असल्याचं स्पष्ट होतं. म्हणजेच सरासरीनुसार दररोज ५ मुली बेपत्ता होत आहेत. 

पोलिसांचे तोकडे प्रयत्न

शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातून पळवून, फूस लावून आणलेली मुलं, महिला मुंबईत आहेत. पण मुंबईतून बेपत्ता झालेले अनेक जण देशाच्या कोनाकोपऱ्यात आखातात लुप्त झाले आहेत. एका बाजूला या मुलांची स्वतःच्या सुटकेसाठी असह्य धडपड सुरू असते. तर त्यांच्या पालकांचा आक्रोश अहोरात्र सुरू असतो. पण पोलिस आणि सरकार याची गांभीर्याने दखल घेताना दिसत नाहीत. बेपत्ता होणाऱ्या मुला-मुलींमध्ये गरीब घरातील लहानग्यांचं मोठं प्रमाण आहे. यापैकी उच्चभ्रू वस्तीतील एखादं मुल बेपत्ता झालं असेल तर पोलिस अटोकाट प्रयत्न करून या मुलाला हुडकून काढतात. त्यातुलनेत सामान्य घरातील बेपत्ता लहानगे आणि महिलांना शोधून काढण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.

धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावरही

रस्ता चुकलेले, घरातून रागावून निघालेले, गर्दीत हरवलेले, प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुली-मुलांचा शोध लागतच नाही. अल्पवयीन मुलांना पळवणाऱ्या, तरुणींना फूल लावून पळवणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात मुंबईत सक्रीय आहेत. बेपत्ता होणाऱ्यांमध्ये बहुतांश जण १८ ते ४९ वर्ष वयोगटातील असतात. यापैकी तरूणी-महिलांचा वापर देहव्यापारात, आखाती देशातील वेश्या व्यवसायात आणि उर्वरितांचा घरकामासाठी केला जातो.  

‘असं’ होतं शोषण

गेल्या २ वर्षांत हजारो महिला मुंबईतून बेपत्ता झाल्या असून अशा कामांसाठी त्यांना अडकविण्यात आल्याचं कळतं. मुलांना परदेशात घरकामांना किंवा कंपनींमध्ये पाठवलं जातं. तर काहींना अंपग बनवून त्यांना भीक मागण्यासाठी लावलं जातं. अल्पवयीन मुलींना विशिष्ट औषधं देऊन तसंच शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या शरीररचनेत बदल करून त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं जाते. मात्र शरीरात करण्यात आलेल्या बदलांमुळे त्यांची आयुर्मयादा कमी होऊन, त्यांचा तरुण वयातच मृत्यू होतो. तर वेश्याव्यवसायात होणाऱ्या शोषणातून त्या अनेक आजारांनाही बळी पडतात. 


दलालांचं जाळ

गावाकडील हे दलाल मुलांच्या कुटुंबाच्या परिचयाचे असतात. राज्याबाहेर ज्या ठिकाणांहून ही मुलं आणली जातात, त्या ठिकाणी असणारं दारिद्रय, बेरोजगारी, मोठं कुटुंब, कुपोषण, अतिपाऊस वा दुष्काळाच्या कारणांना हे दलाल चांगलेच ओळखून असतात. असे दलाल मुलांच्या आईवडिलांच्या मनात मुंबईतील जगण्याचं एक शानदार चित्र त्यांच्यापुढं निर्माण करतात. आधीच्या मुलांना मुंबईत आणून सुरूवातीला काढलेले फोटो दाखवत राहतात. या फोटोवर कुटुंबाचा विश्वास बसतो. या फसव्या जाळ्यात अडकलेले पालक आपल्या मुलांना दलालासोबत पाठवतात. मुलांना मुंबईत घेऊन आलेले हे दलाल पुन्हा गावाकडे तोंड दाखवत नाहीत. दलाल त्या गावचा असेल, तर मुलांची ख्याली खुशालीची पत्रं पाठवून पालकांची फसवणूक सुरू असते.  

भविष्य काळोखात

नोटांबदीनंतर मालाड, मालवणी, कुरारसारख्या भागातील काच कारखान्यांमध्ये, धारावीतल्या जरीकामामध्ये मंदीचं सावट आलं. अशावेळी हातात असलेल्या या मुलांचं करायचं काय? असं म्हणत कारखाना मालकांनी आपल्याकडील मुली कामाठीपुऱ्याच्या रस्त्यावरही विकल्याचं भीषण वास्तव तपासात पुढं आलं आहे. 

शहरातल्या वेश्या व्यवसायात एक नजर टाकल्यास त्यामधील अनेक मुली या पश्चिम बंगाल, म्यानमार, ओडिसा आणि बांगलादेश येथील असल्याचं दिसतं. घरात परिस्थिती बिकट असल्यामुळे अनेकदा दलाल त्यांना मुंबईला चांगल्या पगाराच्या नोकरीची आशा दाखवतात. त्यानंतर मुंबईत आणून वेश्या व्यवसायात ढकलल्याचं तपासात पुढं आलं आहे. शहरातील दलालांच्या तावडीतून सुटका केलेल्या मुलींना त्यांच्या घरातले स्वीकारत नाहीत आणि स्वीकारलंच तरी त्यांच्याशी लग्न करण्यास कुणीही पुढं येत नाही. त्यामुळे त्याचं भविष्य अंधारातच जातं. हे देखील वास्तव नाकारता येत नाही.

कुरार व्हिलेजमधील मुलांची सुटका

जानेवारी २०१६ मध्ये शेतीच्या कामासाठी नेतो असं सांगून ओडिसाहून ९ मुलीचं अपहरण करून त्यांना कोलकातामार्गे मुंबईत आणण्यात आले होतं. इमिटेशन ज्वेलरीची कामं करून घेणाऱ्या मालकाने त्यांना एका खोलीत कोंडून ठेवलं होते. कुटुंबीयांनी ओडिसाच्या बांगरी पोसी या पोलीस ठाण्यात मुलांच्या अपहरणाची तक्रार नोंदवली होती. मात्र पोलिसांनी या घटनेकडं फारसं गंभीरपणे पाहिलं नाही. अपहरणकर्त्यांनी या मुलांना कुरार गावातील शिवकृपा सोसायटीच्या चौथ्या माळ्यावर डांबून ठेवलं होते. अंगावर साधा घालायला कपडाही नाही, अशा अवस्थेत या मुलांना काम करण्यासाठी हा मालक भाग पाडत होता. ज्वेलरीचं काम करताना रासायनिक द्रव्यात हात बुडवून या मुलांची नखं आणि हात पिवळसर झाले होते. मुलांच्या अंगावर बारीक पुरळ उठलं होतं. 

सामाजिक संस्थेचा पुढाकार

या मुलांसाठी मुंबई नवीन होती, त्यात मुलांना हिंदी येत नसल्याने या मुलांपैकी एकाचं अपहरण झाल्याची माहिती एका सामाजिक संस्थेला मिळाली त्यांनी या मुलांचा पाठपुरावा करत मुंबई गाठली. ही मुलं परत हवी असतील तर प्रत्येकी १० हजार रुपये द्या, अशी मागणी करणारा फोन या मुलांच्या घरी गेला, त्याच फोनद्वारे या मुलांचा ठावठिकाणा लागला. सामाजिक संस्थेने संबधित नंबर आणि मुलांची माहिती मुंबईच्या समाज सेवा शाखेच्या पोलिसांना मेलद्वारे पुरवली. मुंबई पोलिसांनी गंभीर्याने तपास सुरू केला. त्यावेळी तपासात तो फोन कुरार गावच्या शिवकृपा एस. आर. ए. हाऊसिंग सोसायटीतून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी एकूण ३ जणांना या प्रकरणी अटक केली. ही मुलं पुन्हा आपल्या पालकांकडे सुखरूप गेली, पोलिसांनाही या उत्कृष्ट कामगिरीसाठी विशेष सन्मानाने गौरवण्यात आलं. 


२०१९ मधील विशेष कारवाई

या वर्षातील मे महिन्यापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईत १८९ गुन्हे नोंदवले असून १७९ जणांना लहान मुलांना कामावर ठेवल्याप्रकरणी मालकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातून २५२ मुलांची सुटका करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुलांना भीक मागायला प्रवृत्त करणाऱ्या ३९ जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध ३५ जणांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ७२ मुलांची सुटका समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी केली आहे.


बेपत्ता मुलींची आकडेवारी:

वर्षदाखल गुन्हेतपास
२०१८
१३३९ (अल्पवयीन)  
१०८२ (अल्पवयीन)  

१२

एकूण
१३५१
१०९१
२०१९५५३ (अल्पवयीन)
४१३ (अल्पवयीन)एकूण
५५८
४१६

 

         


हेही वाचा-

२ कोटींच्या ड्रग्जसह टांझानियाच्या महिलेस अटक, एक्स्प्रेसमधून करत होती प्रवास

Exclusive : अशी आहे डाॅ. पायल तडवीची सुसाइड नोट, वाचा...


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा