अजमेरला नेऊन अल्पवयीन मुलावर अत्याचाराचा प्रयत्न

  Kurla
  अजमेरला नेऊन अल्पवयीन मुलावर अत्याचाराचा प्रयत्न
  मुंबई  -  

  कुर्ल्याच्या नेहरू नगर परिसरातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला अजमेरला नेऊन त्याच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी 35 वर्षीय नराधमाला अटक केली असून शादाब दळवी असे त्याचे नाव आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा कुर्ल्यातील शिवाजी मैदानात खुल्या व्यायामशाळेत व्यायामासाठी जात होता. तेथे दीड महिन्यांपूर्वी त्याची ओळख शादाबसोबत झाली. शादाबने त्याला आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी असल्याचे खोटे सांगितले. दोघांमध्ये चांगली मैत्री झाल्यानंतर शादाबने त्याला अजमेर दर्गा येथे दर्शनासाठी सोबत येण्याचा हट्ट केला. सोबत आल्यास येण्या-जाण्याचा सर्व खर्चही करण्याची तयारी दाखवली.

  पीडित मुलाने सोबत येण्याची तयारी दाखवल्यानंतर ते दोघेही मुंबईतून अजमेरला रवाना झाले. तेथे ते दोघेही एका हॉटेलमध्ये थांबले. या हॉटेलमध्ये शादाबने पीडित मुलाकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याला नकार दिल्यावर शादाबने त्याला जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ दाखवून त्याच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलाने शादाबच्या अत्याचारापुढे न झुकता त्याच्या तावडीतून सुटून कसाबसा पळ काढला. मात्र अनोळखी शहरात त्याच्या ओळखीचे कुणीही नसल्याने त्याला नाईलाजाने त्याच हॉटेलात परतावे लागले. परंतु लवकरच आपली परीक्षा सुरू होणार असल्याचे सांगून पीडित मुलाने त्याला मुंबईत परतण्यास भाग पाडले.

  अखेर दोघांनीही मुंबई गाठल्यावर शादाबने त्याच्यामागे लग्नासाठी लकडा लावला. रात्री अपरात्री फोन करून शादाब त्याला बोलावून घेऊ लागला आणि त्याच्याकडे पुन्हा शरीरसुखाची मागणी करु लागला. शादाबच्या या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलाने नेहरू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

  तक्रार दाखल होताच पोलिसांनी शादाबविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केल्याची माहिती नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपर्डे यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.