'कोहिनूर स्क्वेअर'मधील कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) राज ठाकरे यांना चौकशीसाठी गुरूवारी फोर्ट येथील कार्यालयात बोलवलं आहे. चौकशीसाठी राज ठाकरे हे उपस्थित राहणार असल्यानं कार्यकर्त्यांकडून मुंबईसह महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी दृष्टीकोनातून पोलिसांनी रात्रीपासूनच ईडीच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. त्या परिसरातील वाहनतळ बंद करून पोलिसांनी संपूर्ण परिसर बॅरिकेट लावून रिकामी केला आहे. त्यामुळे राज यांच्या चौकशीकडं अख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं असलं तरी दुसरीकडं पोलिसांची डोके दुखी मात्र चांगलीच वाढलेली पहायला मिळत आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
माहीम इथं असलेल्या मनसेच्या 'राजगड' या मुख्यालयावर बैठक झाली. त्यावेळी राज ठाकरे ज्या दिवशी 'ईडी'च्या समोर चौकशीला जातील, त्याचदिवशी राज्यभरातील मनसेचे कार्यकर्तेही 'ईडी'च्या कार्यालयासमोर हजर राहणार असल्याचं ठरलं होतं. मात्र, खुद्द राज यांनी ईडी कार्यालयाबाहेर न जमण्याचं आवाहन सर्व कार्यकर्त्यांना दिलं आहे. परंतु, राज यांच्या चौकशी दरम्यान कार्यकर्त्यांकडून कोणताही कायदा हातात घेऊ नये तसंच, त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिल अशी घटना घडू नये, या अनुशंगानं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सर्व पोलिस ठाण्यांना मनसेच्या पदाधिकार्यांना १४४ व १४९ सीआरपीसीनुसार नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.
वाहनं शंभर मीटरच्या बाहेर
पोलिसांनी खबरदारी घेतली असली तरी मनसैनिकांचा काही नेम नाही. त्यामुळं गाफील न राहता २१ ऑगस्टच्या संध्याकाळ पासूनच ईडी कार्यालय परिसरातील सर्व वाहनं पोलिसांनी शंभर मीटरच्या बाहेर ठेवली आहे. सर्व परिसर पोलिसांनी बॅरिकेटनं बंदिस्त केला असून, प्रसार माध्यमांना ही येण्यास मनाई केली जात आहे. रात्रभर पोलिस ईडी कार्यालयाबाहेर डोळ्यात तेल घालून बारीक लक्ष ठेवून होते.
हेही वाचा -
मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
टोकाचं पाऊल उचलू नका, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन