मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

SHARE

कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. तसंच, त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. दरम्यान, याप्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तसंच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होईल, असं कोणतेही कृत्य मनसेच्या कार्यकर्त्यांनी करू नये, यासाठी मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा आणला तर कडक कारवाई केली जाईल अशा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

शांतता राखण्याचं आवाहन

याआधी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर सुरुवातीला ठाणे बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. त्याचप्रमाणे २२ ऑगस्टला कार्यकर्ते आणि नेत्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर जमण्याचं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. पण काही वेळातच राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हा निर्णयही मागे घेण्यात आला होता.
संबंधित विषय