पोलिसांच्या उलट्या बोंबा, 4 दिवस उलटले तरीही तक्रारीची नोंदवणूक नाही!


पोलिसांच्या उलट्या बोंबा, 4 दिवस उलटले तरीही तक्रारीची नोंदवणूक नाही!
SHARES

यूट्युबवर सध्या एक चोरीचा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक जण पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल चोरून पळ काढतो. मग त्या चोराच्या मागे मोबाईल मालक पळतो. तर दुसरा चोर त्याचा बॅग देखील पळवून नेतो. नुकताच असा एक प्रकार मुलुंडमध्ये किशोर कृष्णन यांच्यासोबत घडला आहे. त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी खटाटोप केली. पण चार दिवस झाले तरी पोलिस काही त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास तयार नाहीत. पोलिसांचा हा अनुभव धक्कादायक असल्याचं कृष्णन सांगतात.


संपूर्ण प्रकार

मुलुंडच्या छेडानगर परिसरात राहणारे किशोर कृष्णन हे प्रिसेप्टर प्रा. लि. या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहेत. 22 मे रोजी कृष्णन हे रात्री उशिरा कामावरून घरी परतत होते. त्यावेळी रिक्षात डोळा लागल्याने ते झोपले. रिक्षा पंतनगर परिसरातून जात असताना त्यांना जाग आली. रात्रीच्या अंधरात रस्ते कळत नसल्यामुळे कृष्णन यांनी रस्त्यात उभ्या असलेल्या तिघांकडे पत्ता विचारण्यासाठी चालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितली. 

कृष्णन पत्ता विचारत असताना त्या तिघांपैकी एकाने कृष्णन यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. त्या चोराबरोबर इतर दोघेही पळून गेले. त्यानंतर कृष्णन त्या चोराचा पाठलाग करत असताना मागे रिक्षाचालकाने त्यांची बॅग पळवली. त्या बॅगेत लॅपटॉप, मोबाइल, पैशांचं पाकीट, डेबिटकार्ड आणि पंधरा हजार रुपये होते.


तरीही तक्रार नोंदवून घेतली नाही

मध्यरात्री काही किलोमीटर चालून कृष्णन पंतनगर पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी महिला पोलिस अधिकाऱ्यांनी कृष्णन यांची तक्रार ऐकून घेतली. मात्र तक्रार नोंदवण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवलं. कृष्णन हे दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्या वेळी ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी त्या महिला अधिकरी असताना यायला सांगितलं. 

IMG-20180524-WA0052.jpg

कंटाळून कृष्णन पोलिस उपायुक्त 7 यांच्या कार्यालयात गेले. मात्र तेथे उपायुक्त अधिकारीच नव्हते. त्यावेळी तेथील इतर पोलिस अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार पोलिस ठाण्यात देण्यास सांगितलं. त्यानुसार कृष्णन यांनी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली. मात्र चार दिवसांची ऐवढी खटपट करून देखील पोलिसांनी चोरीची तक्रार न नोंदवता, सर्व वस्तू गहाळ झाल्याची तक्रार नोंदवल्याने कृष्णन यांची निराशा झाली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा