आरोपींना तुरूंगाबाहेर काढणाऱ्या टोळीचा तपास 'एसआयटी'कडे

वर्षभरापासून ही टोळी बनावट कागदपत्रं बनवून बोगस जामिनदार उभे करून मुंबईतील सराईत गुन्हेगारांना तुरूंगाबाहेर काढण्यासाठी मदत करायची. या टोळीच्या गुन्ह्यांची व्याप्ती पाहता पोलिसांनी याप्रकरणाचा तपास एसआयटीकडे दिला आहे.

आरोपींना तुरूंगाबाहेर काढणाऱ्या टोळीचा तपास 'एसआयटी'कडे
SHARES

आरोपींच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रांच्या मदतीनं बोगस जामिनदार उभा करून थेट न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गेल्या महिनाभरापासून चाललेल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण २८ जणांना अटक केली आहे. वर्षभरापासून ही टोळी बनावट कागदपत्रं बनवून बोगस जामिनदार उभे करून मुंबईतील सराईत गुन्हेगारांना तुरूंगाबाहेर काढण्यासाठी मदत करायची. या टोळीकडून पोलिसांनी बनावट कागदपत्रं बनवण्यासाठी लागणारी सामग्री देखील हस्तगत केली आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेऊन या टोळीचा पुढील तपास करण्यासाठी आता विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आलं आहे.

एसआयटी करणार तपास

याप्रकरणी सुरूवातीला पोलिसांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत आठ जणांना अटक केली होती. शाकीर हुसेन मेहंदी खान (३५), शफिक रफिक कुरेशी (३४), फय्याज अमनउल्ला खान (३४), इम्रान सुलमानी (२७), मोहम्मद परवेज अब्दुल शेख (५०), रियाज अहमद पठाण (३४), मुझफ्फर काझी (३८), युसुफ खान (३१) अशी या आरोपींची नावं आहेत. हे अारोपी शिवाजीनगर, मानखुर्द, गोवंडी भागातील राहणारे अाहेत. याप्रकरणात आणखी काही जणांना अटक करण्यात आली. जवळपास २८ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. पुढे याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र एका पाठोपाठ एक या प्रकरणात १० गुन्हे नोंदवल्यानंतर पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचा निर्णय घेतला. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) दर्जाचा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केला जाणार आहे

 

न्यायालय परिसरात सापळा

काही दिवसांपूर्वी ही टोळी मुंबई दंडाधिकारी न्यायालयात एका आरोपीला जामिनावर सुटका करून घेण्यासाठी आली होती. त्यावेळी त्यांनी बोगस कागदपत्र सादर करून न्यायालयाची फसवणूक करण्याचा प्रयत्नही केला. मात्र वेळीच ही बाब उघडकीस आली. काही दिवसातच ही टोळी पुन्हा न्यायालय परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सर्वांना ताब्यात घेतले.


बोगस कागदपत्रे जप्त

आरोपींकडून पोलिसांनी ७८ बनावट शिधावाटप कार्ड, मुंबईतल्या विविध पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे ५५ शिक्के, सरकारी अधिकाऱ्यांच्या सह्यांचे बनावट स्टॅम्प पेपर, पॅन कार्ड, बोगस कंपन्याच्या ५८ वेतन पावत्या, १२ बनावट मार्कशिट हस्तगत केले आहेत.



हेही वाचा

स्कूलबसमध्ये गिअरऐवजी लाकडी बांबूचा वापर

‘कौमार्य चाचणी’ केल्यास नोंदवला जाणार गुन्हा



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा