ऑनलाईन सट्टेबाजारात 'मुंबई इंडियन्स'ला सर्वाधिक पसंती


ऑनलाईन सट्टेबाजारात 'मुंबई इंडियन्स'ला सर्वाधिक पसंती
SHARES

अायपीएल आणि सट्टा हे समीकरण काही नवं नाही. मात्र यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सवर सर्वाधिक सट्टा लागल्याचे मुंबई आणि गोवा पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन सट्टेबाजारात 'मुंबई इंडियन्स'ला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. यंदाच्या मोसमात बेटिंगसाठी हायटेक ऑनलाईन पद्धत वापरली जात असल्याचेही उघड झाले आहे. यामुळे पैशांची उलाढाल ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे होते आणि ज्याचा सुगावा देखील लागत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, गोवा पोलिसांनी एका रिसॉर्टवर छापे मारत सट्टेबाजांना अटक केली असून, चौघेही ऑनलाईन बेटिंग करत असताना पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. यातील दोन सट्टेबाज हे अहमदाबाद तर दोन सट्टेबाज आग्र्यातील आहेत. हे चौघेही गोव्यातील रिसॉर्टमध्ये आयपीएलच्या 10 व्या मोसमाच्या सुरुवातीपासून बेंटिंग करत असल्याची माहिती गोव्याचे पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली. या सट्टेबाजांकडून 11 मोबाईल, टीव्ही, 2 लॅपटॉप पोलिसांनी हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे चार राज्यांमध्ये या सट्टेबाजांचं नेटवर्क असून, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं जाळं पसरलं आहे.

तर दुसरीकडे नवी मुंबईमध्ये देखील क्राईम ब्रांचने कोलकाता नाईट रायडर्स आणि सन रायजर्स हैदराबादवर ऑनलाईन सट्टेबाजी करताना चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून टीव्ही, सेट टॉप बॉक्स, लॅपटॉप, 18 मोबाईल आणि 1 लाख 15 हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. विशेष म्हणजे यवतमाळमध्ये देखील रवी जैस्वाल नावाच्या एका सट्टेबाजाला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून 30 हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

असा लागलाय सट्टा
मुंबई इंडियन्स - 1 रुपयाला 3 रुपये 30 पैसे
कोलकाता नाईट रायडर्स - 1 रुपयाला 4 रुपये 40 पैसे

दरम्यान, किंग्स इलेव्हन पंजाबने जर आपले पॉइंट्स वाढवले आणि मॅचेस जिंकले तर खूप मोठा फायदा सट्टेबाजांना होऊ शकतो. यामुळे सट्टेबाज एका रात्रीत करोडपती बनू शकतो अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा