‘जानी दुश्मन’ फेम अभिनेता रजत बेदीच्या कारची पादचाऱ्याला धडक, गुन्हा दाखल

कामावरुन परत येत असताना रजतच्या गाडिनं रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली.

‘जानी दुश्मन’ फेम अभिनेता रजत बेदीच्या कारची पादचाऱ्याला धडक, गुन्हा दाखल
SHARES

अभिनेता रजत बेदीच्या (Rajat Bedi) कारनं धडक दिल्यामुळे ३९ वर्षीय व्यक्ती जखमी झाली आहे. ही व्यक्ती मुंबईच्या डी एन नगर परिसरात राहणारी आहे. सोमवारी कामावरुन परत येत असताना रजतच्या गाडिनं रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली.

रजत बेदीनेच त्याला कूपर रुग्णालयात दाखल केलं आणि मदत करण्याचं आश्वासनही दिलं, अशी माहिती जखमी व्यक्तीच्या कुटुंबानं दिली आहे. जखमी राजेश रामसिंग दूत यांची प्रकृती गंभीर आहे.

डी एन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी सांगितलं, की अभिनेता रजत बेदीविरोधात आयपीसी कलम 279 आणि 338, तसंच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कुर्डे म्हणाले की, कार स्वतः रजत बेदी चालवत होता. रस्ता क्रॉस करणाऱ्या व्यक्तीला रजतच्या गाडीनं उडवलं. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

जखमी राजेश रामसिंग दूत यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरनं सांगितलं की, “त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. कारण त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ते आयसीयूमध्ये असून ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यांना तातडीनं रक्ताची गरज आहे.”

राजेशची पत्नी बबिता दुत म्हणाली, “माझे पती कामावरून परतत असताना संध्याकाळी ६.३० वाजता घरी येत होते. अंधेरी वेस्ट लिंक रोडवर शीतला देवी मंदिराजवळ ही घटना घडली. अभिनेता रजत बेदी एमएच 02 सीडी 4809 ही आपली कार चालवत होता. त्यानं माझ्या पतीला रस्ता ओलांडत असताना धडक दिली. तो खाली पडला, त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली आहे. माझ्या पतीला काही झाल्यास रजत बेदी जबाबदार असेल, त्याला अटक करा” अशी मागणी बबिता यांनी केली आहे.

पोलीस हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत रजत बेदी निघून गेला होता. त्यानंतर तो परतला नाही. डीएन नगर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं आहे.

अभिनेता रजत बेदीनं अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. इंटरनॅशनल खिलाडी, जोडी नंबर वन, जानी दुश्मन, कोई मिल गया, अक्सर, पार्टनर यासारख्या सिनेमांमध्ये तो झळकला आहे.



हेही वाचा

नोकरीची ऑनलाईन ऑफर एका शिक्षिकेला पडली महागात

नियमांचे उल्लंघन करत दही हंडी साजरी केल्याने ११ गुन्हे

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा