
कमला मिल कंपाऊंडमधील 'वन अबोव्ह' पब अँड रेस्टाॅरंटमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. या आगीच्या घटनेनंतर फरार झालेले पबचे मालक म्हणजेच या घटनेतील तीन मुख्य आरोपींचा शोध घेण्यात असमर्थ ठरलेल्या मुंबई पोलिसांनी आरोपींचा ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांचं इनाम शुक्रवारी जाहीर केलं आहे.
कमला मिलमधील आगीच्या घटनेनंतर पोलिसांनी क्रिपेश संघवी, जीगर संघवी आणि अभिजीत मानकर अशा वन अबोव्ह पबच्या तीन संचालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मात्र या दुर्घटनेला ८ दिवस उलटून देखील तिघांपैकी एकाही फरार आरोपीला पकडण्यात ना. म. जोशी पोलिसांना यश आलेलं नाही.
या सर्वांविरोधात लूकआउट नोटीस जारी केल्यानंतर पोलिसांनी संघवी बंधूच्या तीन नातेवाईकांना अटक केलं होतं. मात्र या नातेवाईकांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी वाढलेला दबाव पाहता पोलिसांनी त्यांच्यावर इनाम घोषित केलं आहे. या तिघांबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीला १ लाखाचं इनाम देण्यात येईल, असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचा-
कमला मिलमधील ती आग हुक्क्यामुळेच!
माझ्यावर गुन्हा का नोंदवला? मोजोस बिस्ट्रोच्या मालकाचा सवाल
