एकतर्फी प्रेमातून तरुणीची बदनामी करणारा अटकेत


एकतर्फी प्रेमातून तरुणीची बदनामी करणारा अटकेत
SHARES

एकतर्फी प्रेमातून तरुणीचं फेसबुक खातं हॅक करून तिची बदनामी केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. रवींद्र कासारे असं या आरोपीचं नाव आहे. यापूर्वीही या तरुणानं याच तरुणीला अशाप्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी दोन वेळा अटकही केली होती. मात्र जामीनावर बाहेर येऊन हा माथेफिरू पुन्हा त्या तरुणीला त्रास देत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


तरुणीच्या नावाने अश्लिल व्हाॅटस-अॅप ग्रूप

प्रभादेवी परिसरात राहणारी २२ वर्षीय तरुणी आणि आरोपी रविंद्र २०१२ साली किर्ती काॅलेजमध्ये एकत्र शिक्षण घेत होते. त्यावेळी दोघांची चांगली मैत्री झाली होती. मात्र कालांतरानं रवींद्र वारंवार फोन करून त्रास देत असल्याने २०१५ मध्ये तरुणीनं त्यांच्याशी बोलणं सोडलं. मात्र तरीही रवींद्र अापला भाऊ आणि काकाच्या फोनवरून फोन करून त्या तरुणीला त्रास द्यायचा. बोलण्यास नकार दिल्याच्या रागातन रवींद्रने तरुणीला शिवीगाळ केली होती. एवढ्यावरच न थांबता रवींद्रने व्हाॅट्स-अॅपवर तरुणीच्या नावाने अश्लील ग्रूप बनवून तिच्या घरातल्यांना त्या ग्रूपवर अॅड करत, तरुणीच्या नावे अश्लील चर्चा करू लागला.


कामाच्या ठिकाणीही केला तमाशा

तरुणी कामाला असलेल्या मालाड इथं जाऊन रवींद्रने धिंगाणा घातला होता. हा तमाशा केल्यानंतर तरुणीने २०१६ मध्ये बांगूरनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मात्र त्यावेळी रवींद्रची जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. जामीनावर सुटल्यानंतरही २०१६ मध्ये रवींद्र विविध मार्गानं तरुणीला त्रास द्यायचा. त्यामुळे २०१६ मध्ये देखील तरुणीने दादर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र पुन्हा रवींद्रला जामीन मिळाला.


तरुणीच्या बहिणीचे बनावट फेसबुक खाते उघडले

रवींद्रच्या वागणुकीला कंटाळून अखेर तरुणीने स्वतःचा नंबर बदलला. तरुणीचा नंबर पुन्हा मिळवण्यासाठी त्याने तिच्या नातेवाईकांचे बनावट फेसबुक अकाऊंट बनवून त्याद्वारे तरुणीच्या बहिणीकडे तिचा मोबाइलनंबर मागू लागला. मात्र वेळीच ही बाब तरुणीच्या बहिणीच्या लक्षात एका नातेवाईकाने आणून दिली. आपला डाव फसल्याचं लक्षात आल्यानंतर रवींद्रने पुन्हा तरुणीच्या बहिणीला फोन करून शिविगाळ केली. तसेच तरुणीच्या नावाने बनावट फेसबुक खाते बनवून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तरुणीने फेब्रुवारी महिन्यात दादर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार १६ मार्च रोजी पोलिसांनी पुन्हा रविंद्रला अटक केली. सध्या तो जामीनावर बाहेर पडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा