खासदार हुसेन दलवाई यांना लुबाडणारे अटकेत


खासदार हुसेन दलवाई यांना लुबाडणारे अटकेत
SHARES

मुंबईत सर्व सामान्यांना लक्ष करणाऱ्या सायबर चोरट्यांनी आता थेट खासदारांना ७० हजार रुपयांना गंडवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोनाते मोहम्मद (३१), ओकपेईफोह मायकल (३१) आणि ओत्तरा एन गोलहाऊद (३२) अशी या तीन आरोपींची हुसेन दलवाई यांचं ई-मेल आयडी हॅक करून ही फसवणूक केली होती. सध्या या तिघांना सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे.

मुंबईत वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास होत असताना सरकार मात्र कॅशलेस कारभारासाठी आग्रही आहे. मात्र याच सायबर गुन्हेगारांनी आता लोकप्रतिनिधींनाही लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी या सायबर चोरट्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदर हुसेन दलवाई यांचा ई-मेल आयडी हॅक केला.


संपूर्ण प्रकार

दलवाई यांच्या ई-मेल आयडीच्या मदतीने ते आर्थिक अडचणीत असल्याचा मजकूर नागरिकांना पाठवून त्याद्वारे आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं. आर्थिक मदत मागवलेल्या मेलवर या भामट्यांनी स्वतःचे खाते नंबर लिहिलं होतं. काही जणांनी दलवाई यांना आर्थिक मदत हवी असल्याचं वाटल्यानं त्यांनी पैसे पाठवण्यास सुरुवात केली. त्यातीलच एका मदतगाराने दलवाई यांना पैसे पोहचलेत हा याबाबत विचारल्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला.


आरोपींना पोलिस कोठडी

घडलेल्या या प्रकरणानंतर दलवाई यांच्या खासगी सचिवाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा माग काढत सायबर पोलिसांनी दिल्लीतून कोनाते मोहम्मद (३१), ओकपेईफोह मायकल (३१) आणि ओत्तरा एन गोलहाऊद (३२) या तीन आफ्रिकन आरोपींना अटक केली. या तिघांकडून लॅपटॉप, पेनड्राईव्ह, डोंगल, मोबाईल, दोन हॅंडसेट्स आणि वेगवेगळ्या नावांचे एटीएम कार्ड्स, ७० हजार रुपये आदी संगणकीय साधने आणि पुरावे पोलिसांनी हस्तगत केले. या तीनही आरोपींना २ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सायबर गुन्हे विभागाचे पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा