फेसबुकवरील मैत्री शिक्षिकेला भोवली, ६८ हजारांना घातला गंडा

काही महिने दोघांमध्ये बोलणे सुरू असल्याने अरविंदने पोलंडमधून युगंधराला एक गिफ्ट पाठवायचे असल्याचे सांगत त्यांचा मोबाइल नंबर मागितला. विश्वासापोटी त्यांनीही मोबाइल नंबर अरविंदला दिला. त्यावेळी युगंधराच्या व्हाॅट्स अॅपवर अरविंदरने सोन्याच्या नेकलेसचा फोटो पाठवला आणि हे गिफ्ट असल्याचं लिहिलं होतं.

SHARE

फेसबुकवर अनोळखी व्यक्तीने ना.म.जोशी मार्ग परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेला काही दिवसांपूर्वी ६८ हजार रुपयांना गंडा घातला होता. या गंडा घालणाऱ्या नायझेरियन टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी बंगळुरूहून चिनेडु श्रीवेंसा ओरजी, माइक उड्डे जिडेन या दोन नायझेरियन तरुणांना अटक केली आहे. यांच्या चौकशीतून या दोघांनी शेकडो नागरिकांना अशा प्रकारे गंडवल्याची कबुली दिली आहे. 


फ्रेंड रिक्वेस्ट

ना.म.जोशी मार्ग परिसरात कुटुंबियांसोबत राहणारी युगंधरा (नाव बदललेले आहे) ह्या वरळी येथील एका नामांकीत हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत. सप्टेंबर २०१८ महिन्यात त्यांना फेसबुक अकाऊंटवरील मेसेंजरवर अरविंद कुमार नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्याची रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर दोघेही मेसेंजर अॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. अरविंदने युगंधरा यांना आपण अमेरिकन नेव्हीत कॅप्टन पदावर असल्याचं सांगितलं होतं. तसंच सध्या अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणेसोबत पोलंडला आलो असल्याचं सांगितलं. 


कस्टम ड्युटीची मागणी

काही महिने दोघांमध्ये बोलणे सुरू असल्याने अरविंदने पोलंडमधून युगंधराला एक गिफ्ट पाठवायचे असल्याचे सांगत त्यांचा मोबाइल नंबर मागितला. विश्वासापोटी त्यांनीही मोबाइल नंबर अरविंदला दिला. त्यावेळी युगंधराच्या व्हाॅट्स अॅपवर अरविंदरने सोन्याच्या नेकलेसचा फोटो पाठवला आणि हे गिफ्ट असल्याचं लिहिलं होतं. १२ आॅक्टोंबर रोजी युगंधराच्या फोनवर एक फोन आला. त्यावेळी समोरील महिलेने आपण  दिल्लीच्या कस्टम आॅफीसमधून बोलत असल्याचं सांगितलं. तुमचे पार्सल आले असून त्यासाठी तुम्हाला ६८ हजार रुपये कस्टम ड्युटी भरावी लागेल असं सांगितलं. 


शिक्षेची भिती दाखवली

युगंधरा यांनी महिलेने दिलेल्या अकाऊंटवर ६८ हजार ५०० रुपये पाठवले. पैसे पाठवलेले अकाऊंट हे झाकी उल्ला शरीफ या नावाच्या व्यक्तीचं होतं. पैसे पाठवल्याचं युगंधराने दिल्लीतील त्या महिलेस फोन करून सांगितले. मात्र पुन्हा दुपारी ३ वाजता त्या महिलेचा फोन आला. त्यावेळी तिने त्या पार्सलमध्ये काही विदेशी चलन आढळून आले असून तुम्हाला त्याचा दंड म्हणून २ लाख भरावे लागतील असं सांगितले. दंड न भरल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते असंही घाबरवलं. 


फसवणूक झाल्याची खात्री

याबाबत युगंधराने अरविंदला फोन करून विचारले असता त्याने देखील आपण तुला खर्चासाठी ३० हजार डाॅलर पाठवले असल्याचं सांगितलं. तोपर्यंत दिल्लीतील त्या महिलेने पुन्हा कोटक महिंद्रा या बँकेच्या खात्यावर २ लाख रुपये भरण्यास सांगितलं. त्या महिलेवर संशय आल्याने युगंधराने शुरजी वल्लभदास रोड, बलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई येथील कस्टम आॅफीसला भेट देऊन आपल्या नावावर कोणते पार्सल आले आहे का ते तपासलं. मात्र फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर युगंधराने थेट ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाणे गाठत अरविंदकुमार विरोधात तक्रार नोंदवली.


बंगळुरूतून अटक

त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. ज्या बँक खात्यावर  युगंधराने पैसे पाठवले. ते खाते बंगळुरू येथील असल्याने पोलिसांचे पथक बंगळुरू येथे पोहोचले. त्यांनी प्रथम बँक खाते असलेल्या झाकी उल्ला शरीफ या तरुणाला शोधून काढले. बँक खाते आपलेच असून ते मणिपुरी नागरिक नरेश चिरोम हा वापरत असल्याचं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी चिरोम याला ताब्यात घेतले. चिरोट याने चौकशीमध्ये आणखी धक्कादायक माहिती सांगितली. बंगळुरूमध्ये काही नायजेरियन तरुण स्थानिक नागरिकांना बँक खाती मिळवून देण्याचे काम करीत असल्याचे चिरोम याने सांगितलं. चिरोमने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून चिनेडु श्रीवेंसा ओरजी, माइक उड्डे जिडेन या दोघांना बंगळुरूतून अटक केली आहे. सध्या दोघेही पोलिस कोठडीत आहेत. हेही वाचा -

देवेन भारतींची बदली, साडेचार वर्षांपासून होते एकाच पदावर

Exclusive - सी लिंकची सुरक्षा वाढवणार
संबंधित विषय
ताज्या बातम्या