एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ची बहिण हसीना पारकरचा मुंबईमध्ये दबदबा होता. कुख्यात गुंडांना हाताशी बाळगून हसीना आपाने मुंबईमध्ये आपले वर्चस्व निर्माण केलेल होतं. पण सध्या तिचा वारसा चालवत होती ती म्हणजे करीम आपा. मुंबई बेकायदेशीर झोपडपट्ट्या उभारून त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या आणि बेकायदेशीर पणे हत्यार बाळगून कुख्यात गुंडांना पुरवणाऱ्या करीम मुजीब शाह (४३) या महिलेला मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने तुरुंगात धाडलेलं आहे. करीमा आपा बरोबरच तिच्या तीन हस्तकांना सुद्धा मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि बारा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत.
हेही वाचाः- नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ८० रुग्ण
कांजूरमार्ग परिसरात १४ नोव्हेंबर रोजी सराईत आरोपी पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय सावंत, सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील वंजारी यांनी सापळा रचून विनोद गायकवाड (३८) याला ताब्यात घेतले. त्याच्या अंग झडतीत पोलिसांना त्याच्याजवळ १ वेपन आणि २ काडतुस सापडली. विनोदवर २ हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. विनोदच्या चौकशीतून पोलिसांना त्याचा दुसरा साथीदार नुकताच यूपीतून मुंबईला येण्यासाठी निघाला असल्याचे कळाले. तो मुंबईत पोहचायच्या आधीच पोलिस त्याच्या स्वागताला उभे होते. त्याच्या चौकशी पोलिसांना त्याच्या घरातून १ वेपन आणि १ काडतुसं सापडली. दोघांनीही ही हत्यार करिमा आपाचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युसुफने ठेवण्यासाठी दिल्याचे पोलिसांना सांगितले.
हेही वाचाः- रक्तदान करा, १ किलो पनीर, चिकन मिळवा
त्यानुसार पोलिसांनी मोहम्मद युसुफ अब्दुल कयूब (३२) चा शोध सुरू केला. पोलिस युसुफच्या मागावर असताना तो नळबाजार कुर्ला परिसरात असल्याचे कळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याजवळून पोलिसांनी ४ काडतुस हस्तगत केली. युसुफच्या चौकशीत करिमा आपाचं नाव समोर आलं. युसुफच्या तोंडातून करिमा आपाची माहिती पोलिसांना कळताच, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या महिलेवर एक दोन नव्हेत तर तब्बल २ डझन गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात २ हत्या, खंडणी, धमकावणे, अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर मुंबईसारख्या शहरात तिने शेकडो अनधिकृत झोपड्या उभ्या करून त्या विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. तिच्या विरोधात गुन्ह्याचा आलेख पाहता. पंतनगर पोलिसांनी तर तिला तडीपार घोषीत केले आहे. मात्र पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून ती वर्सोवा परिसरात वास्तव्यास होती.
हेही वाचाः- भारत बंद! मुंबईत बेस्ट, टॅक्सी सुरू राहणार
आरोपींच्या चौकशीतून करिमा आपाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला वर्सोवा परिसरातून अटक केली.२००५ मध्ये तिच्या विरोधात अनधिकृत झोपड्या उभ्या करणे, विकणे, खाली करणे या गुन्ह्यांविरोधात गुन्हा नोंद झाला. त्यानंतर तिने चोरीचा माल विकण्यास सुरूवात केली. झोपड्यांच्या वादातून तिने २०१४ मध्ये एका महिलेची हत्या देखील केली आहे. त्यानंतर परिसरात तिच्या नावाचा मोठा दबदबा होता. जो तो तिला घाबरायचा. ‘झोपडपट्टी क्विन’ म्हणून ती परिसरात फेमस होती. मात्र भल्या भल्या गुंडांनी हाथ टेकलेल्या मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांसमोर करिमा आपाचंही काही चाललं नाही. करिमा आपाचा पर्दाफाश केल्यानंतर न्यायालयाने तिला ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांच्या चौकशीत करिमाने आपल्या सर्व गुन्ह्यांची कबूली देत, या गुन्ह्यांसाठी लागणारे वेपन हे यूपीतून आणल्याची कबूली दिली. सध्या करिमाही न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोग आहे.