१०० नंबरवर तक्रार नोंदवलीत? येऊ शकतो धमकीचा फोन!!

नियमानुसार पोलिस नियंत्रण कक्षात तक्रार नोंदवणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जातं. पण, इथं मदत मिळणं तर दूरच काही घटनांमध्ये नियंत्रण कक्षाला फोन का केला? म्हणून तक्रारदारांनाच आरोपींकडून धमकवलं जात असल्याने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

१०० नंबरवर तक्रार नोंदवलीत? येऊ शकतो धमकीचा फोन!!
SHARES

आपल्या समस्यांचं निवारण करण्यासाठी तक्रारदार मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून त्यांची मदत घेतात. संकटसमयी नियंत्रण कक्षाद्वारे आपल्याला तातडीने मदत मिळेल, अशी तक्रारदारांची अपेक्षा असते. सोबतच नियमानुसार तक्रारदारांचं नावही गुप्त ठेवलं जातं. पण, इथं मदत मिळणं तर दूरच काही घटनांमध्ये नियंत्रण कक्षाला फोन का केला? म्हणून तक्रारदारांनाच आरोपींकडून धमकवलं जात असल्याने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


ट्राॅम्बे, ओशिवरा पोलिसांत तक्रार

या प्रकरणी ट्राॅम्बे आणि ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारदाराची माहिती उघड केल्याप्रकरणी २ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या पूर्वी देखील अशा प्रकारे माहिती उघड केल्याप्रकरणी २ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आला होती. मात्र यातून पोलिसांनी काहीही धडा घेतलेला नसल्याचं दिसून येत आहे.




प्रकरण काय?

ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत विश्वकर्मा यांना काही दिवसांपूर्वी ओशिवऱ्यातील एका रेस्टाॅरंटमध्ये बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर चालत असल्याची माहिती मिळाली होती. या बेकायदा हुक्का पार्लरवर कारवाई व्हावी म्हणून त्यांनी यासंदर्भातील माहिती नियंत्रण कक्षाला दिली. या तक्रारीचे ३ फोन विश्वकर्मा यांनी नियंत्रण कक्षाला केले. त्यानंतर पोलिस आले आणि करवाई न करता केवळ पाण्याची बाटली घेऊन निघून गेले.



जीवे मारण्याची धमकी

पोलिस निघून गेल्यानंतर विश्वकर्मा यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. तुम्ही माझी तक्रार नियंत्रण कक्षाला का करत आहात? आपण यावर बसून बोलूया, असं म्हणत हा अनोळखी तक्रारदार विश्वकर्मा यांना वैयक्तिक माहिती विचारू लागला. विश्वकर्मा यांनी माहिती देण्यास नकार दिल्याने समोरच्या व्यक्तीने विश्वकर्मा यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विश्वकर्मा यांनी त्या अनोळखी व्यक्तीविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात २१ फेब्रुवारी रोजी तक्रार नोंदवली.


दुसरी घटना कुठे?

दुसरी घटना ट्राॅम्बे परिसरात घडली. इथं राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते शकिल शेख बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी महात्मा फुले नगर येथून मुलीसोबत जात होते. तेव्हा त्यांना रस्त्यात मोठ्या आवाजात डिजे वाजताना दिसला. यासंदर्भातील तक्रार शकिल यांनी नियंत्रण कक्षाला केली. त्यानंतर काही वेळातच शकिल यांना एका अनोळखी नंबरहून एका महिलेचा फोन आला. ही महिला शकिल यांना त्याची वैयक्तिक माहिती विचारू लागली. "तुमने मेरी कम्प्लेंट क्यू की, नाम क्या है तुम्हारा?'' असं त्यांना विचारू लागली. त्यावर शकिलने तिला माझा नंबर कुठून मिळाला? हे विचारल्यावर "तुम्हारा नंबर मुझे पुलिस के कम्प्युटरसे मिला." असं तिने शकिल यांना सांगत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली.



त्यानंतर काही वेळाने पुन्हा एका अनोळखी व्यक्तीने शकिल यांना फोन केला. आपण फ्लिपकार्टमधून बोलत असल्याचं सांगून तुमच्या घरी पार्सल पोहोचवायचं आहे, तेव्हा पत्ता सांगा, असं विचारू लागला. मात्र अशी कुठलीही आॅर्डर दिलेली नसल्याने शकिल यांनी त्यांचा डाव ओळखून फोन कट केला. मात्र नियंत्रण कक्षातील पोलिसांनी नाव उघड केल्याने त्यांना फोनवर जीवे मारण्याच्या धमक्याही येऊ लागल्या आहेत. त्यानुसार शकिल यांनी ट्राॅम्बे पोलिस ठाण्यात धमकी देणारे अनोळखी व्यक्ती तसंच माहिती उघड करणाऱ्या पोलिसांविरोधात तक्रार नोंदवली आहे.


काय सांगतो नियम?

समाजात सुरू असलेल्या चुकीच्या गोष्टीची माहिती तुम्ही पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवा. तक्रारदारचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, असं आश्वासन वारंवार मुंबई पोलिसांकडून दिलं जातं. पण अशा तऱ्हेने तक्रारदारांचं नाव उघड करून त्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार पोलिस कर्मचाऱ्यांकडून होत असल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.



हेही वाचा-

डान्स बारवर कारवाई, पोलिस उपायुक्ताने लगावली सहकाऱ्याच्या कानशीलात



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा