वडाळ्यात पोलीस उप-निरीक्षकावर जीवघेणा हल्ला

 wadala
वडाळ्यात पोलीस उप-निरीक्षकावर जीवघेणा हल्ला

वडाळा - वडाळा पोलीस ठाण्यातील एका कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना वडाळ्यातील संगमनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री घडलीय. या घटनेत पोलीस उपनिरीक्षक संदीप माने गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्या डोक्यावर आणि हाताला गंभीर दुखापत झालीय. त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये फरार आरोपी फैय्याज उर्फ फैज वसीम अहमद शेख, साजिद वसीम अहमद शेख, फैसल वसीम अहमद शेख आणि बन्नी वसीम अहमद शेख यांचा शोध वडाळा टी टी पोलीस घेत आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी तलवारीसह लोखंडी रॉड जप्त केला आहे.

19 नोव्हेंबरला मध्यरात्री 3.15 वाजता संगमनगर परिसरात काहीजण तलवार घेऊन एका व्यक्तीला जीवे मारण्याच्या तयारीत असल्याची खबर गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला मिळाली. घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने तात्काळ आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आरोपींनी हातात तलवार आणि लोखंडी रॉड घेऊन एका व्यक्तीला मारण्याच्या तयारीत असताना पोलीस उपनिरीक्षकाने त्यांना रोखले. त्यामुळे आरोपींनी रागाच्या भरात मागेपुढे न पाहता पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला चढवला. घटनेची खबर लागताच रात्री गस्तीवर असलेले एसीपी. अशोक सातपुते, वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे, यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी पोलीस उपनिरीक्षकाला शीव रुग्णालयात भरती केले.

या प्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Loading Comments