खंडणीसाठी सामाजिक संस्थेच्या संचालिकेवर जिवघेणा हल्ला, डी गँगचा हात?

वांद्र्याच्या प्रसिद्ध सामाजिक संस्थेच्या संचालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शबनम शेख यांना मागील अनेक दिवसांपासून अंडरवर्ल्डकडून एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावले जात होते. धमकीचं सत्र सुरू असतानाच शनिवारी त्यांच्यावर दोन अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

खंडणीसाठी सामाजिक संस्थेच्या संचालिकेवर जिवघेणा हल्ला, डी गँगचा हात?
SHARES

वांद्र्यातील नामांकित सामाजिक संस्थेच्या संचालिका असलेल्या महिलेला खंडणीसाठी अंडरवर्ल्डकडून येणाऱ्या धमकीचं सत्र सुरू असतानाच शनिवारी त्यांच्यावर दोन अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. यात संचालिका शबनम हमीद शेख यांच्या गाडीची काच फुटली असून सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा शकील, उस्मान चौधरी, फहिम मचमच, ललित शर्मा, बिलाल शमसी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे.


खंडणीसाठी धमकी

वांद्र्याच्या प्रसिद्ध सामाजिक संस्थेच्या संचालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शबनम शेख यांना मागील अनेक दिवसांपासून अंडरवर्ल्डकडून एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावले जात होते.


यांना अटक

शबनम यांना मारण्यासाठी फहिमने फेसबुकवरून देशभरातील आठ शूटर्सशी संपर्क साधला होता. त्यावेळी पंजाबचा शूटर जगबीर सिंगला शबनम याची माहिती आणि फोटोही पाठवले होते. त्याचबरोबर शहरातील दोन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ऑनलाईन गेम्सचा संचालक यांची माहिती गोळा करण्याचं कामही जगबीरला देण्यात आलं होतं. हत्येसाठी जगबीर मुंबईतही दाखल झाला होत. मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी त्या वेळीच ताब्यात घेतले. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत हरिशकुमार नरेशकुमार यादव, बिलाल कुतुबुद्दीन शमसी आणि जगबीरला अटक केली आहे.


असा झाला हल्ला

दरम्यान या गुन्ह्यात एका मागोमाग एक आरोपी अटक होत असताना, अंडरवर्ल्डकडून मात्र शबनम यांना मारण्याचा प्रयत्न सुरूच असल्याचं दिसून येत आहे. शनिवारी शबनम या त्यांच्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर गेल्या असताना अचानक गोळी झाडल्याचा आवाज आला आणि शबनम यांच्या गाडीची काच फुटली. सुदैवाने या हल्ल्यात आपण थोडक्यात बचावल्याचा दावा शबनम यांनी केला. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात तसा गुन्हाही नोंदवला आहे. मात्र पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्हीत शबनम यांच्यावरील हल्ला अस्पष्ट दिसत असल्याचं वांद्रे पोलिसांकडून सांगितलं जात आहे. आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती शबनम यांनी फेसबुक या सोशल मीडियांच्या माध्यमातून दिली.

संबंधित विषय