मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय

साकीनाका भागात एका महिलेची अत्याचारानंतर क्रूर हत्या केल्याची घटना नुकतीच घडली.

मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय
SHARES

साकीनाका भागात एका महिलेची अत्याचारानंतर क्रूर हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. यानंतर पोलिस खात्याने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पोलिस ठाण्यातील या 'निर्भया' पथकात सहनिरीक्षक किंवा उपनिरीक्षक दर्जाच्या महिला पोलिस अधिकारी, महिला कॉन्स्टेबल, एक पुरुष कॉन्स्टेबल व चालक यांचा समावेश असेल.

मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला अधिकाऱ्यांनी सज्ज एक विशेष 'निर्भया पथक' असेल. तशा सूचना पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मंगळवारी दिल्या. तसेच, महिलांविरुद्ध गुन्हे अधिक असलेल्या भागात गस्त वाढवावी, अशा सूचनादेखील नगराळे यांनी दिल्या आहेत.

'मोबाइल-५' हे वाहन या विशेष दलासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या दिमतीला असेल. तसेच, प्रत्येक पोलिस ठाण्यात एक फिरते गस्तीवाहन २४ तास तैनात असेल. पोलिस आयुक्तांच्या निर्देशांनुसार जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, प्रत्येक 'निर्भया' दलाला २ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याखेरीज मुलींचे वसतिगृह, लहान मुलांचे अनाथालाय आदी भागांतून माहिती शोधून काढणे, यासाठीही या दलाला प्रशिक्षित केले जाणार आहे.

महिलांविरुद्ध अत्याचार किंवा गुन्हे अधिक होत असलेले भाग संबंधित पोलिस स्थानक शोधून काढेल. त्याखेरीज झोपडपट्टी, बगीचे, शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे व मॉल्स येथील एकांतातील ठिकाणांची प्रत्येक पोलिस ठाण्यात नोंद असेल. अशा भागांवर नियोजनबद्ध गस्त घातली जाईल. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांना पोलिसांनी मदत करावी किंवा अशा महिलांना तिच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी वाहनाची सोय करावी, अशा सूचनादेखील पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

याखेरीज, पोलिस स्थानकाच्या भागात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिलांची यादी तयार करणे व अशा महिलांकडे गस्तीदरम्यान भेट देऊन त्यांची विचारपूस करण्याची सूचनादेखील पोलिसांना देण्यात आल्या आहेत. महिलांच्या मदतीसाठीचा '१०३' क्रमांकाची सर्वत्र जाहिरात करावी. तसेच, मागील पाच वर्षांत महिलांविरुद्ध गुन्हे केलेल्या आरोपींची स्वतंत्र यादी प्रत्येक पोलिस स्थानकाला तयार करायची आहे. याखेरीज प्रत्येक शाळा, महाविद्यालय व मुलींच्या वसतिगृहात तक्रारीसाठी 'निर्भया तक्रार बॉक्स' ठेवला जावा. अत्याचार किंवा विनयभंग झालेल्या महिलांच्या मार्गदर्शनासाठी 'सक्षम' मोहिम राबवली जावी, अशा सूचनादेखील पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा