कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मोठा दिलासा मिळाला आहे. कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते, असं एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासाअंती उघड झालं आहे.
आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही असं या समितीनं म्हटलं आहे. या प्रकरणात एनसीबीनं असं म्हटलं होतं की अरबाज मर्चंट याच्याकडे ड्रग्ज सापडले होते. हे ड्रग्ज तो आर्यन खानसाठी घेऊन आला होता. त्याचबरोबर एनसीबीचा दावा असा होता की आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडून हे ड्रग्ज आले होते आणि आर्यन खान या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्याच विशेष चौकशी समितीच्या तपासानंतर आर्यन खानकडे कोणतंही ड्रग नव्हतं आणि त्याचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नव्हता हे उघड झालं आहे. तसंच अरबाज मर्चंटकडे सापडलेले ड्रग्ज हे व्यावसायिक वापराच्या प्रमाणापेक्षा कमी होते. शिवाय, ते आर्यन खानसाठीच होते हेही तपासात कुठेही सिद्ध झालं नाही. या अहवालामुळे त्याला क्लीनचिट मिळण्याची शक्यताही वाढली आहे.