कोविड हेल्पलाइनकडून प्रतिसाद मिळेना, सहपोलिस आयुक्तांचं पालिका आयुक्तांना पत्र


कोविड हेल्पलाइनकडून प्रतिसाद मिळेना, सहपोलिस आयुक्तांचं पालिका आयुक्तांना पत्र
SHARES
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारे पोलिस ही या संसर्गजन्य रोगाने ञस्त आहेत. मुंबई पोलिस दलातील 618 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली असून त्यांना वेळीच पालिकेच्या हेल्पलाईनवर मदत मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी के.ई.एम रुग्णालयात ही एका पोलिस शिपायाने या प्रकारावर उजेड टाकण्याचा प्रयत्न करत व्हिडिओ वायरल केला होता. कोरोना बाधीत पोलिस कर्मचार्यांना होणाऱ्या नाहक ञासाची गंभीर दखल घेत, मुंबईच्या सह पोलिस आयुक्त नवल बजाज यांनी पालिका आयुक्तांना पञ लिहित नाराजी व्यक्त केली आहे. 

मुंबई महापालिकने कोरोना पिडित रुग्णांसाठी किंवा तक्रारींसाठी 1916 ही हेल्पलाइन सुरू केली आहे. या नंबरवर कोरोना पेशंटसाठी नजीकच्या कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत.या माहितीसह डाॅक्टरांचं टेलिफोनिक मार्गदर्शनही मिळणार आहे. 1916 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून 3 क्रमांक निवडल्यास कोरोना रुग्णांसाठी जवळच्या कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत. याबाबत तात्काळ माहिती मिळते. तर, 1 क्रमांक निवडल्यास कोरोनाबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन केले जाते. या मार्गदर्शनादरम्यान डॉक्टरांना संबंधित व्यक्तीची वैद्यकीय चाचणी गरजेची आहे असे वाटल्यास, त्यांना त्यांच्या घराजवळच्या वैद्यकीय प्रयोगशाळेचा संपर्क क्रमांक देण्यात येतो. ज्या व्यक्तींना रुग्णवाहिकेची गरज आहे, त्यांनी 2 पर्याय निवडल्यास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते. माञ प्रत्यक्षात तसे होत नसल्याचे मुंबई पोलिस सह आयुक्त नवल बजाज यांनीच पालिका आयुक्तांना पञ लिहून त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. 


राज्यातील 1328 पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 618 पोलिस म्हणजेच  निम्मे पोलिस हे मुंबई पोलिस दलातील आहे. तर आतापर्यंत 8 पोलिस कर्मचाऱ्यांचा या संसर्गजन्य विषाणूने मृत्यू झालेला आहे. पोलिस दलात ही कोरोनाने बाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असताना. त्यांना रुग्णालयात उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यासाठी पालिकेच्या रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. 7 ते 8 तासाच्या प्रतिक्षेनंतर  पोलिसांना रुग्णवाहिका उपलब्ध होत आहे. पालिकेच्या हेल्पलाइनवर संपर्क करून ही वेळेत कोरोना बाधित पोलिस रुग्णंासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्याचे परिणाम पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर होत असल्याचे मुंबई पोलिस दलातील प्रशासन विभागाचे  सह पोलिस आयुक्त नवल बजाज यांनी पालिका आयुक्तांना लिहिलेल्या पञात म्हटले आहे.

त्यामुळे पालिकेने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकांपैकी 12 रुग्णवाहिका पोलिसांच्या 13 परिमंडळाकरिता प्रत्येकी 1 रुग्णवाहिका ही पोलिसांसाठी उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी नवल बजाज यांनी पालिका आयुक्त पञ लिहून कळवली आहे. पोलिसांना वेळीच वैद्यकिय उपचार मिळण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तालयात मुंबई पोलिस कोविड 19 कक्षची स्थापना करण्यात आली असून पालिकेशी समन्वय साधण्यासाठी पोलिस विभागातर्फे विशेष हेल्पलाइन सुरू आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा