नशा करणाऱ्यांचा संयम सुटला, तंबाखू, सिगारेटसाठी 2 दुकानं फोडली


नशा करणाऱ्यांचा संयम सुटला, तंबाखू, सिगारेटसाठी 2 दुकानं फोडली
SHARES
संपूर्ण देशभरात 14 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन  असल्याने जीवनावश्यक सेवा वगळत इतर सर्व उद्योगधंदे, दुकाने सक्तीने बंद ठेवण्यात आली आहेत. यामध्ये मद्य उत्पादन करणारे कारखाने आणि मद्यविक्री करणाऱ्या दुकानांचाही समावेश आहे. शिवाय राज्याच्या सीमा देखील सील असल्याने बाहेरच्या राज्यातून होणारी मद्य वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प आहे.  त्यामुळे दररोजची नशा करणाऱ्यांचे वांदे झाले असून नशेच्या चस्क्या पाई त्यांनी आता थेट दुकाने फोडून चोरी करण्यास सुरूवात केली आहे. नुकत्याच अशा दोन घटना दादर आणि अंधेरी परिसरात उघडकीस आल्या आहेत.



कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे मद्यप्रेमींप्रमाणे तंबाखू-गुटखा खाणारे आणि धूम्रपान करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. सिगारेटच्या एका पाकिटसाठी काळ्याबाजारात 250 ते 300 रुपये मोजावे लागत आहेत. तंबाखूच्या 7 रुपयाच्या पुडीची किंमत 25, तर 10 रुपयांच्या पुडीसाठी 50 रुपये मोजावे लागत आहेत. दारू पिणाऱ्यांना दारू दुप्पटीने मिळत असल्याने ते हैराण झाले आहेत. या नशेबाजांचा संयम आता सुटू लागला असून नशेसाठी आता ते दुकान फोडायला लागले आहेत. अंधेरीतील घाटकोपर लिंक रोड येथील साटमवाडी भागातील सीताराम गुजर यांच्या टपरीतून 60 हदार रुपयांचे सिगारेट चोरीला गेले आहेत. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानातील इतरसकोणत्या ही वस्तूला हात न लावता दुकानातील फक्त सिगारेटचे बाँक्सचं चोरून नेले आहे. सोमवारी सीताराम यांना टपरी फोडून चोरी झाल्याचे कानावर आल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी टपरीच्या मागील बाजूचा पत्रा उचकटल्याचे दिसले.  गुजर यांनी दरवाजा उघडून पाहणी केली असता, सिगारेटची 450 पाकिटे, तंबाखूच्या पुड्या असा  65 हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याचे समजले. त्यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

तर प्रभादेवी परिसरातील नागो सयाजीची वाडी येथील सदानंद कोंडविलकर यांच्या पानाच्या टपरीतून सिगारेटचा साठा लंपास करण्यात आला. टपरीतील दिवा सुरू असून, दरवाजा उघडा असल्याची माहिती एका स्थानिकाने दादरमध्ये राहणाऱ्या कोंडविलकर यांना दूरध्वनीवरून दिली. त्यानंतर त्यांनी टपरीवर जाऊन पाहिले असता 1000 रुपये आणि 5000 रुपयांच्या सिगारेट गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा