सराईत ड्रग्ज तस्कराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या


सराईत ड्रग्ज तस्कराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
SHARES

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका बड्या तस्कराला वांद्रे यूनिटने अटक केली आहे. शाबीर हानिफ खान असं या आरोपीचं नाव आहे. मागील अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्याच्याजवळून 1 किलो एमडी ड्रग्ज हस्तगत केलं आहे.


सापळा रचून अटक

अंधेरी डोंगर परिसरात एक सराईत तस्कर अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एएनसी वांद्रे युनिटचे विशाल खैरे आणि त्याच्या पथकाने या आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला होता. शाबीरवर यापूर्वीही ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांची नोंद असून पोलिस त्याच्या मागावर होते. शाबीर हा बीएमसी स्कूल कामारोडवर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 1 किलो एमडी आढळून आलं. ज्याची बाजारात किंमत अंदाजे 20 लाख रुपयांपर्यंत आहे.


20 गुन्ह्यांची नोंद

जोगेश्वरी पूर्वेला राहणारा शाबीर हा सराईत आरोपी असून अंमली पदार्थ तस्करीचे त्याच्यावर 20 गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. शाबीरच्या अटकेनंतर या तस्करीत सहभागी असलेल्या मोठ्या तस्करांची नावं पुढे येण्याची शक्यता पोलिस उपायुक्त शिवदिप लांडे यांनी वर्तवली आहे.




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा