जामीनावर सुटून केला बलात्कार

  Samta Nagar
  जामीनावर सुटून केला बलात्कार
  मुंबई  -  

  कांदिवलीतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाफ मर्डरसहित इतर अनेक गंभीर गुन्ह्यांत जामीनावर सुटलेल्या आरोपीने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय धुमाळ (25) असे या नराधमाचे नाव आहे.

  समता नगरजवळील पोईसर परिसरात राहणाऱ्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अक्षयनं आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत दोन वर्षे शारीरिक संबंध ठेवले. एकेदिवशी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिची आई तिला शताब्दी रुग्णालयात सिटी स्कॅन करण्यास घेऊन गेल्यावर साऱ्या प्रकरणाचा खुलासा झाला.

  सिटी स्कॅन करणाऱ्या डॉक्टरांनी स्वत: हून समता नगर पोलिसांना बोलावून घेत पीडित मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती दिली. हे एेकूण पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पोलिसांनीही तत्काळ या प्रकरणाची दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले.

  यासंदर्भात समता नगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप यादव म्हणाले की, बलात्कार प्रकरणातील आराेपी कुठलाही कामधंदा करत नाही. तो कांदिवलीतील हनुमान नगरमध्ये राहतो. मात्र संपूर्ण दिवस पोईसरमधील टवाळखोरांसोबत वेळ घालवतो. पीडित मुलगी त्याच्या बिनधास्त वागण्यावर आकर्षित होऊन त्याच्या संपर्कात आली. तेव्हा त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.

  आरोपी अक्षय धुमाळ याच्यावर पोलिसांनी भादंवि कलम 376 (ड) 504, 506 आणि पॉस्को अॅक्ट 4, 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.