नितेश राणे पुन्हा अडचणीत

  Mumbai
  नितेश राणे पुन्हा अडचणीत
  मुंबई  -  

  सतत या नं त्या कारणासाठी चर्चेत राहिलेले नारायण राणे यांचे पुत्र आणि काँग्रेस आमदार नितेश राणे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. चार वर्षांपूर्वी म्हणजे 2013 साली गोव्यामध्ये टोलनाक्यावर तोडफोड केल्याप्रकरणाचं भूत नितेश राणे यांच्या मानगुटीवर पुन्हा बसलं आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी नितेश राणे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. 

  नितेश हे काँग्रेसचे कणकवली मतदारसंघाचे आमदार होण्यापूर्वीची ही घटना आहे. नितेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते सिंधुदुर्गातून गोव्याला जात होते. त्यावेळी त्यांना रस्त्यात कलंगुट टोलनाक्यावर टोलसाठी अडवले. मात्र आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहोत, अशी ओळख नितेश यांनी त्यावेळी दिली होती. गाडी सरकारी नसल्यामुळे टोल कर्मचाऱ्यांनी गाडी सोडण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या नितेश यांचे अंगरक्षक आणि कार्यकर्त्यांनी टोल कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच टोलचीही तोडफोड केली. 

  यावेळी नितेश यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणे हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा ते प्रकरण बाहेर काढून पोलिसांनी नितेश यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणाचे आरोपपत्र पर्नम स्थानिक न्यायालयाकडे सोपवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल परब यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.