पालिका पार्किंगच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट

शनिवारी मोहितच्या या कृत्याची माहिती कुलाबा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मोहित एका वाहनचालकाला खोटी पावती देऊन त्याच्याकडून अनधिकृतपणे शुल्कवसुली करत होता. पोलिसांना पाहून मोहितने पावती पुस्तक खिशात टाकले.

पालिका पार्किंगच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट
SHARES

कुलाबा, नरिमन पॉइंट, चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनस आदी भागांत महापालिकेचे ५७ वाहनतळ आहेत. या वाहनतळांवर वाहने उभी करणाऱ्यांकडून शुल्क वसूल करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली होती. यातील अनेक कंत्राटदारांची मुदत संपुष्टात आली आहे. याचाच फायदा घेत बोगस पावती पुस्तक छापून लूटारू नागरिकांची लूट करत असल्याचे उघडकीस आले आहे. अशाच एका लूटारूला कुलाबा पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.


रेडिओ क्लब येथे पार्किंगच्या बनावट पावत्या

आरोपी मोहित मोहनलाल चौरसिया उर्फ सोनू कफ परेडच्या बी. जी. मार्ग परिसरात राहतो. शनिवार-रविवारी वीक एण्डला अनेक नागरिक कफ परेड, गेट-वे परिसरात फिरायला येतात. शहरात वाहनांची वाढती संख्या आणि पार्किंगचा प्रश्न लक्षात घेता वाहनांना पार्किंग मिळत नाही. याच संधीचा फायदा घेऊन मोहित कुलाबा रेडिओ क्लब येथे बनावट पार्किंग पावती पुस्तक घेऊन वाहनचालकांची लूट करायचा.


पोलिस आले आणि पावतीपुस्तक खिशात!

शनिवारी मोहितच्या या कृत्याची माहिती कुलाबा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मोहित एका वाहनचालकाला खोटी पावती देऊन त्याच्याकडून अनधिकृतपणे शुल्कवसुली करत होता. पोलिसांना पाहून मोहितने पावती पुस्तक खिशात टाकले. पोलिसांनी त्याची झडती घेतली, त्यावेळी त्याच्याजवळ बोगस पावती पुस्तक सापडले. वाहनचालकांकडे चौकशी केली असता, मोहित अनधिकृत रित्या पैसे गोळा करत असल्याचे समोर आले. त्यानुसार कुबाला पोलिसांनी मोहितवर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.


बचावासाठी फोडून घेतलं डोकं!

पोलिस कारवाईतून वाचण्यासाठी मोहित पोलिस ठाण्यात आरडा ओरड करत होता. एवढ्यावरच न थांबता, मोहितने पोलिस ठाण्यातील लोखंडी दरवाजावर स्वतःचे डोके आपटून स्वतःला जखमी केले. मात्र, न्यायालयात त्याने 'पोलिसांनी आपल्यावर चुकीचा गुन्हा नोंदवत अटक केली, गुन्हा कबुल करावा यासाठी मारहाण केल्याचे' सांगत पोलिसांना अडकवण्याचा प्रयत्न केला.


सकाळी पावत्या, दुपारी छू मंतर!

शहरात पार्किंगची व्यवस्था बिकट आहे. हे ओळखून हे लूटारू सकाळी कार्यालयात येणाऱ्यांच्या गाड्या वाहनतळांवर उभ्या करून घेऊन गायब होतात. या वाहन चालकांकडून प्रत्येकी दोन तासाचे 40 रुपये प्रमाणे पैसे घेतले जातात. त्यानंतर सायंकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळी हे लुटारू हजर होतात आणि वाहने मालकांच्या ताब्यात देतात. त्या भागात पोलिसांची गाडी येताच हे लुटारू पावती पुस्तक खिशात घालून तिथून पळ काढतात.


इतर लुटारूंचा शोध सुरू

अशा प्रकारे सर्वसामान्यांची लूट करणारा मोहित हा एकटा नाही. तर त्याच्यासोबत अनेक जण मुंबईतल्या विविध भागात अशा प्रकारे नागरिकांची लूट करत असल्याचे तपासात पुढे आले आहे. ही लूट करताना बोगस पावती पुस्तक आरोपींनी कसे बनवले? कुठून बनवले? याचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच दक्षिण मुंबईत कुठल्या कंत्राटदारांची मुदत संपली आहे? या रॅकेटमागचा मुख्य सूत्रधार कोण? याचा पोलिस शोध घेत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा