म्हाडाला ६१ लाखांचा चुना! आरोपी अटकेत

मोहम्मद जावेद खान याने काही दिवसांपूर्वी 'मे साद एन्टरप्रायझेस' ही कंपनी त्याची पत्नी किश्वर सिद्दीकी हिच्या नावाने स्थापन केली होती. या कंपनीद्वारे तो म्हाडातून इमारत दुरूस्तीचे कंत्राट घ्यायचा.

म्हाडाला ६१ लाखांचा चुना! आरोपी अटकेत
SHARES

म्हाडाच्या अंतर्गत येणाऱ्या इमारतीच्या दुरूस्तीची खोटी बिले लावून म्हाडाची ६१ लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या इसमाला खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद जावेद खान (४२) असे या आरोपीचे नाव असून तो चालवत असलेली कंपनी त्याची पत्नी किश्वर सिद्दीकी हिच्या नावावर आहे. त्यामुळे पोलिस तिचा देखील या गुन्ह्यात सहभाग आहे का? याचा शोध घेत आहेत.


पत्नीच्या मालकीत खोटी कंपनी

या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद जावेद खान याने काही दिवसांपूर्वी 'मे साद एन्टरप्रायझेस' ही कंपनी त्याची पत्नी किश्वर सिद्दीकी हिच्या नावाने स्थापन केली होती. या कंपनीद्वारे तो म्हाडातून इमारत दुरूस्तीचे कंत्राट घ्यायचा. नुकतीच त्याला म्हाडाच्या जे. एस. एस. रोड चंदनवाडी, भुलेश्वर, गिरगाव इ. परिसरातील इमारतींच्या दुरूस्तीचे कंत्राट मिळाले होते.


दुरूस्ती नाहीच, बिल दिलं ६१ लाख!

दरम्यान, या इमारतींची डागडुजी न करता, इमारतीची डागडुजी व दुरूस्तीची खोटी बिले मोहम्मदने म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुर्नरचना मंडळाच्या लेखा विभागात सादर करत ६१ लाख रुपये घेतले होते. मोहम्मदने सादर केलेल्या बिलांची पडताळणी केली असता ती खोटी असल्याचे उघड झाले.

त्यानुसार म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांंपूर्वी खेरवाडी पोलिस ठाण्यात 'मे. साद एन्टरप्रायझेस' कंपनीचे मालक आणि मोहम्मद विरोधात गुन्हा नोंदवला होता. म्हाडा अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे दाद मागितल्याची माहिती मिळाल्यानंतर हे दोघे नवरा बायको फरार झाले होते.


आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी

दरम्यान, खेरवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक जगदेव कालपाडा आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या पथकाने मोहम्मदला नुकतीच अटक केली. या गुन्ह्यात मोहम्मदची पत्नी आणि 'मे. साद एन्टरप्रायझेस' कंपनीची मालकिन किश्वर सिद्दीकी हिच्या सहभागाबाबत पोलिस तपास करत आहेत. न्यायालयाने मोहम्मदला ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा

'मुंबई लाइव्ह'चा दणका: जाहिरातीविना घर देणं म्हाडा अधिकाऱ्यांना भोवलं!

अभिनेत्री दिपाली सय्यदचा म्हाडाला फसवण्याचा प्रयत्न?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा