घातक शस्त्राच्या तस्करीप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अमित शाहा याला अंधेरीतून अटक केली आहे. दचकलात ना? मात्र तुम्ही समजताय ते हे अमित शाहा नसून हा एक सराईत भुरटा चोर आहे. अंधेरी कोर्टात तस्करीसाठी आला असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
मूळचा नाशिकचा रहिवासी असलेला अमित गिरगाव परिसरात राहतो. त्याच परिसरात तो हमालीसह मिळेल ते काम करून स्वत:चा उदरनिर्वाह करतो. घातक शस्त्राची तस्करी केल्यास जास्त मोबदला मिळेल या आमीषापोटी तो हे काम करत होता. त्याच्या एका मित्राने त्याला हे शस्त्र विक्रीसाठी दिलं होतं. न्यायालयात सराईत आरोपींना शिक्षा सुनावली जाते. त्याच ठिकाणी पोलिसांचाही कायम वावर असतो. मात्र अशा ठिकाणी तस्करी केल्यास कुणीही फारसं संशय घेणार नाही.
त्याने तस्करीसाठी अंधेरी कोर्ट हे ठिकाण निश्चित केलं. दरम्यान तो न्यायालय परिसरात घातक शस्त्राची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला सापळा रचून अटक केली. त्याला ही घातक शस्त्राची तस्करी करण्यास भाग पाडणाऱ्याचा पोलिस शोध घेत आहे.