नक्षली पत्रात काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांचा फोन नंबर

चळवळ वाढवण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी प्रकाश यांनी सुरेंद्र गडलिंग यांना पत्र पाठवलं होतं. त्यात दिलेल्या नंबरवर संपर्क करून पैसे मिळतील असं लिहिलं होतं. त्यातील एक नंबर हा दिग्विजय सिंग यांचा असल्याचं तपासात उघडकीस अालं अाहे.

SHARE

नक्षली संबंधांच्या संशयावरून ५ डाव्या विचारवंतांवर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. या विचारवंतांच्या घरातून अाणि कार्यालयातून हजारो संशयास्पद कागदपत्रे, ई-मेल असा दस्तावेज पोलिसांनी ताब्यात घेतला होता. यामधील एका कागदपत्रात काँग्रेसचे कायमच चर्चेत असलेले नेते दिग्विजय सिंग यांचा फोन नंबर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

काॅम्रेड प्रकाश यांनी सुरेंद्र गडलिंग यांना लिहिलेल्या पत्रात दिग्विजय यांच्यासह अन्य काही जणांचे मदतगार म्हणून फोन नंबर पाठवले आहेत. त्यामुळे पुणे पोलिस दिग्विजय यांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. 


कागदपत्रे, लॅपटॉप जप्त

२९ ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी देशभरात ९ ठिकाणी छापे मारत नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधांवरुन वरवरा राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा व वर्नन गोन्साल्विस यांना अटक केली होती. या कारवाईवेळी पोलिसांनी त्यांच्या घरासह कार्यालय अशा ९ ठिकाणी मारलेल्या छाप्यात पोलिसांनी हजारो कागदपत्रे, काॅम्प्युटर्स, लॅपटॉप पासवर्डसह ताब्यात घेतले. 


सरकार उलथवण्याचा कट 

 पोलिसांच्या हाती आलेले ई-मेल, पत्रे व अन्य साहित्यातून मोठ्या षडयंत्राची माहिती समोर आली. या माहितीनुसार नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा विकत घेण्याचा, त्याद्वारे देशात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा आणि केंद्रातील सरकार उलथवण्याचा कट होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात १५ लाख रुपये पुरवण्यात अाले होते. त्यावरून या पाचही जणांचे माओवाद्यांशी संबध असल्याचंही स्पष्ट होत असल्याचं पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 


 घातपाताचा उल्लेख 

कॉम्रेड सुदर्शन यांनी कॉम्रेड गौतम नवलखा यांना लिहिलेलं पत्रही पोलिसांनी वाचून दाखवलं. रोना विल्सन यांनी ४ लाख राऊंड, ग्रेनेड आणि ८ कोटी रुपयांचा उल्लेख असलेलं पत्र कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलं होतं. यामध्ये राजीव गांधी यांच्या हत्येसारख्या घातपाताचा उल्लेख होता व मोदींच्या हत्येचा कटही होता. कॉम्रेड सुधा भारद्वाज यांचंही पत्र पोलिसांनी वाचून दाखवलं. रोना विल्सननी मिलिंद तेलतुंबडे यांना लिहिलेल्या पत्रात भीमा कोरेगाव दंगलीत एल्गार परिषद महत्त्वाची ठरल्याचा उल्लेख केला होता. भाजपाच्या ब्राह्मणी कार्याविरोधात दलितांचं आंदोलन उभं करण्याचाही त्यात उल्लेख असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. 


पोलिसांचा दुजोरा

ही चळवळ वाढवण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी प्रकाश यांनी सुरेंद्र गडलिंग यांना पत्र पाठवलं होतं. त्यात दिलेल्या नंबरवर संपर्क करून पैसे मिळतील असं लिहिलं होतं. त्यातील एक नंबर हा दिग्विजय सिंग यांचा असल्याचं तपासात उघडकीस अालं अाहे. पुणे पोलिसांनी याला दुजोराही दिला आहे. त्यामुळे लवकरच पुणे पोलिस दिग्विजय यांना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हेही वाचा - 

नालासोपाऱ्यात सातव्या मजल्यावरून पडून चिमुरडीचा मृत्यू

डॉक्टर तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकणारा अटकेत
संबंधित विषय
ताज्या बातम्या